CoronaVirus मैसुरू जिल्ह्यातील औषध कंपनी बनली कोरोना रुग्णांची हॉटस्पॉट
By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2020 05:48 AM2020-04-10T05:48:11+5:302020-04-10T05:48:25+5:30
२,४०० क्वारंटाईन; बंगळुरूपाठोपाठ सर्वाधिक रुग्ण
मैसुरू : कर्नाटकातील बंगळुरू शहरानंतर मैसुरू जिल्हा कोरोनाचा हॉटस्पॉट बनला आहे. तेथील नांजनगुडू शहरातल्या ज्युबिलियंट लाईफसायन्सेस या कंपनीत काम करणाऱ्या एका कर्मचाºयाला कोरोनाची लागण झाली. त्यानंतर या कंपनीतील काही कर्मचाऱ्यांनाही त्या विषाणूची बाधा होऊन रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली.
कर्नाटकातील १८५ रुग्णांपैकी बंगळुरूमध्ये ६३ व मैसुरू जिल्ह्यात ३५ रुग्ण आहेत. विदेशातून बंगळुरूमध्ये परतलेल्यांपैकी अनेक जणांना कोरोनाची लागण झाली आहे. नांजनगुडू येथील ज्युबिलियंट लाईफसायन्सेस या कंपनीच्या क्वालिटी अॅशुअरन्स विभागामध्ये काम करणाºया एका व्यक्तीला कोरोनाची बाधा झाल्याचे २६ मार्च रोजी वैद्यकीय चाचणीच्या अहवालातून स्पष्ट झाले.
एक हजार कर्मचारी काम करीत असलेली ही कंपनी सध्या सील करण्यात आली असून, २,४०० लोकांना क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे. इतकेच नव्हे तर अख्ख्या नांजनगुडूमध्ये टाळेबंदी पुकारण्यात आली आहे.
मैसुरू जिल्ह्यातील ३५ कोरोना रुग्णांपैकी २४ जण ज्युबिलियंट लाईफसायन्सेस या कंपनीचे कर्मचारी आहेत. अन्य नऊ जणांना दिल्लीतील तबलिगी जमातच्या कार्यक्रमात कोरोनाची लागण झाली, तर उर्वरित दोन रुग्ण दुबईहून मैसुरूला आले आहेत. (वृत्तसंस्था)
रुग्णांच्या प्रकृतीत सुधारणा
मैसुरू मेडिकल कॉलेज अँड रिसर्च इन्स्टिट्यूटचे डीन डॉ. सी.पी. नांजराज यांनी सांगितले की, ज्युबिलियंट लाईफसायन्सेस या कंपनीतील कोरोनाची लागण झालेल्या पहिल्या कर्मचाºयाने त्याआधी एका खासगी डॉक्टरकडे उपचार घेतले होेते. कोरोनासदृश लक्षणे महिनाभरापासून दिसत असूनही या कर्मचाºयाने त्याची माहिती राज्याच्या आरोग्य यंत्रणेला दिली नाही. या रुग्णावर सरकारी इस्पितळात उपचार सुरू असून, त्याची प्रकृती सुधारत आहे.