Coronavirus: संकटकाळात नरेंद्र मोदींचा जुन्या सहकाऱ्याला फोन; ५ मिनिटांचा ‘असा’ भावनिक क्षण!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2020 01:05 PM2020-04-24T13:05:56+5:302020-04-24T13:06:47+5:30
१९५६ पासून बागडी भारतीय जनसंघाशी जोडले होते. कार्यकर्ता म्हणून त्यांनी जनसंघ व भाजपाची सेवा केली.
नरवाना - भारतीय जनसंघाचे सदस्य आणि भारतीय जनता पक्षाचे जुने कार्यकर्ते सीताराम बागडी यांची गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोन करुन विचारपूस केली. दोघांनी सुमारे पाच मिनिटे चर्चा केली. बाबा कुंडी येथील रहिवासी सीताराम बागडी सध्या हरियाणा अनुसूचित जाती महामंडळाचे संचालक आहेत. या फोनमुळे सीतराम बागडी भावूक झाल्याचं पाहायला मिळालं.
१९५६ पासून बागडी भारतीय जनसंघाशी जोडले होते. कार्यकर्ता म्हणून त्यांनी जनसंघ व भाजपाची सेवा केली. १९९२ मध्ये जींद येथे भाजपचे जिल्हाध्यक्ष झाले. त्यावेळी नरेंद्र मोदी हे प्रदेश भाजपाचे प्रभारी होते आणि मुख्यमंत्री मनोहर लाल संघटनेचे मंत्री होते. त्यावेळी जेव्हा भारतीय जनता पक्षाची दर तीन महिन्यांनी बैठक होत होती तेव्हा मोदी आणि बागडी यांची भेट नेहमी होत असे. प्रदेश सरचिटणीस, प्रदेश उपाध्यक्ष म्हणून बागडी यांनी काम केले आहे.
२००५ मध्ये नरवाना येथून विधानसभा निवडणुकीत सीताराम बागडी यांनाही पक्षाने तिकीट दिले होते, परंतु त्यांना निवडणूक जिंकता आली नाही. त्यांचा मुलगा भगवती प्रसाद बागडी हेदेखील मागील निवडणुकीत तिकीटाचे दावेदार होते. सकाळी ते नाश्ता करत असताना त्याचवेळी मुलगा भगवती प्रसाद बागडी यांचा फोन वाजला. फोन पंतप्रधान कार्यालयाचा होता. लाइनवर पंतप्रधानांचे पीए होते. पंतप्रधान सीताराम बागडी जी यांच्याशी चर्चा करतील असं त्यांनी सांगितलं. या दोघांमधील संभाषण खालील प्रमाणे
पंतप्रधान: बागडी सर, कसे आहात, नमस्कार, ठीक आहे. तुमचे आरोग्य कसे आहे? कुटुंबातील मुलं बरी आहेत का?
बागडी: हॅलो सर. अनेक दिवसांनी मोबाइलवर तुमच्याशी बोलतोय, आपल्याशी बोलताना आनंद होतो. तुम्ही जगात भारताचे नाव उज्वल केले आहे. कोणत्या शब्दात मी तुमची स्तुती करु.
पंतप्रधान: नाही! नाही! अशी काही गोष्ट नाही बागडी जी. आपण जुने सहकारी आहोत.
बागडी: जी, सर तुमच्याशी बोलून आनंद झाला. आपण आज बोलून धन्य केलं.
पंतप्रधान: तुमच्या आसपास कोरोनाचा काय परिणाम आहे?
बागडी: सर, आमच्या जींद जिल्ह्यात कोरोना व्हायरस पॉझिटिव्ह नाही. दोन प्रकरणे आली होती, आता ते बरेही झाले आहेत.
पंतप्रधान: लॉकडाऊनचा तुमच्यावर काय परिणाम?
बागडी: छान चालले आहे सर. लोक आपले शब्द काळजीपूर्वक ऐकत आहेत आणि ते अंमलात आणत आहेत. लॉकडाऊनचं पूर्णपणे पालन होत आहे. लॉकडाऊन लावल्याने कोरोना व्हायरस महामारी खूप प्रमाणात नियंत्रणात आली आहे.
यानंतर दोघांनी एकमेकांचे धन्यवाद मानत फोन ठेवून दिला.