CoronaVirus: नऊ वाजता नऊ मिनिटं मेणबत्ती पेटवण्यापेक्षा...; आव्हाडांनी सांगितली योजना
By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2020 03:03 PM2020-04-03T15:03:14+5:302020-04-03T15:06:30+5:30
Coronavirus: जनतेला इतकंही मूर्खात काढू नका; पंतप्रधान मोदींवर आव्हाडांची टीका
नवी दिल्ली: कोरोनाविरुद्धच्या लढाईत आपण सगळे एक आहोत, आपण सर्व मिळून एकत्रितपणे हा संघर्ष करत आहोत, यासाठी येत्या रविवारी रात्री ९ वाजता ९ मिनिटं दिवा, मेणबत्ती, टॉर्च किंवा मोबाईलचा फ्लॅश पेटवू, असं आवाहन आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं. यावरुन कॅबिनेट मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मोदींवर टीका केली. देशाला इतकंही मुर्खात काढू नका, अशा शब्दांत आव्हाड मोदींवर बरसले.
'भारताने कोरोनाविरुद्धची लस शोधली, एकालाही मास्क कमी पडू देणार नाही. डॉक्टरांच्या मागे आम्ही उभे आहोत. कुठलाही गरीब उपाशी झोपणार नाही, असं भाषण मोदींकडून अपेक्षित होते. तर त्यांनी ह्या संकटाचाही इव्हेंट करायचं ठरवलं. म्हणे... अंधार करा आणि बॅटरी पेटवा. देशाला इतकेही मुर्खात काढू नका,' असं आव्हाड यांनी ट्विटमध्ये म्हटलं. मेणबत्त्या पेटवण्यापेक्षा मी गरिबांना दान करेन, असं आव्हाड म्हणाले आहेत.
भारताने कोरोनाविरुद्धची लस शोधली,एकालाही मास्क कमी पडू देणार नाही. डॉक्टरांच्या मागे आम्ही उभे आहोत.कुठलाही गरीब उपाशी झोपणार नाही. असे भाषण मोदींकडून अपेक्षित होते.
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) April 3, 2020
तर त्यांनी ह्या संकटाचाही इव्हेंट करायच ठरवल
म्हणे... अंधार करा आणि बॅटरी पेटवा.
देशाला इतकेही मुर्खात काढू नका. pic.twitter.com/ZDOgvQDzPK
'मी मूर्ख नाही. मी दिवा लावणार नाही. त्यापेक्षा मी काही पैसे गरिबांना दान करेन. त्यातून त्यांना मदत होईल. इतक्या गंभीर परिस्थितीतही पंतप्रधान इव्हेंट करत आहेत. देशातील एकही व्यक्ती उपाशी झोपणार नाही. कामगारांचे, मजुरांचे हाल होणार नाहीत. रुग्णांना चांगले उपचार मिळतील. डॉक्टरांना उत्तम दर्जाचे मास्क मिळतील, असं काहीतरी पंतप्रधान बोलतील, असं वाटलं होतं. देशाला त्यांच्याकडून हीच अपेक्षा होती. मात्र त्यांनी गंभीर परिस्थितीचाही इव्हेंट केला', अशी टीका आव्हाड यांनी केली.
काय म्हणाले आहेत पंतप्रधान?
कोरोनाच्या संकटाविरुद्ध लढाईला प्रकाशित करत हे तेज आपल्या चारही दिशांना पसरवायचं आहे. ५ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता मला तुमच्या सर्वांची ९ मिनिटं हवी आहेत. घरातील सर्व लाईट्स बंद करा, दरवाजे आणि बालकनीत उभं राहून दिवा, मेणबत्ती, टॉर्च अथवा मोबाईलची फ्लॅश लाईट सुरु करा. प्रकाशाच्या महाशक्तीमुळे आपण या युद्धाशी लढतोय आपण एकटे नाही तर १३० कोटी जनता एकच संकल्प घेऊन लढतेय हे सर्वांना कळेल असं नरेंद्र मोदी म्हणाले.