Coronavirus: मजुरांच्या मनात विश्वास निर्माण करण्याची गरज- नितीन गडकरी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2020 08:21 AM2020-05-17T08:21:34+5:302020-05-17T08:23:32+5:30
केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरींनी मजुरांबद्दल चिंता व्यक्त केली आहे.
नवी दिल्लीः गेल्या काही दिवसांपासून देशात कोरोनाचं थैमान वाढत आहे. कोरोनाला थोपवण्यासाठी लॉकडाऊनही करण्यात आला आहे. लॉकडाऊनमध्ये हातावर पोट असणाऱ्या मजुरांचे प्रचंड हाल होत आहेत. अनेक मजुरांनी आपापल्या घरचा मार्ग धरला आहे. मजुरांना दिलासा देण्यासाठी केंद्राच्या स्तरावरून हरेक प्रयत्न सुरू आहेत. केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरींनी मजुरांबद्दल चिंता व्यक्त केली आहे.
मजुरांना दिलासा देण्याचे प्रत्येक पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. सरकारनं आपले धान्याचे कोठारही उघडले आहे. केंद्राबरोबरच इतर संघटनाही मजुरांच्या मदतीसाठी प्रयत्नशील असल्याचं नितीन गडकरींनी सांगितलं. आजतकचा खास कार्यक्रम ई-एजेंडामध्ये गडकरी बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या घोषणेनंतर अर्थमंत्री निर्मला सीतारामण गरिबांसाठी उचललेल्या पावलांची सविस्तर माहिती दिली आहे. प्रवासी मजूर आतून घाबरलेले आहेत. मजुरांच्या मनात विश्वास निर्माण करायला हवा. परिस्थिती हळूहळू सामान्य होत असल्याचं त्यांना सांगावं लागणार आहे.
देशाची अर्थव्यवस्थाही हळूहळू रुळावर येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जे पॅकेज दिलं आहे, ते अर्थव्यवस्थेच्या सुधारणेसाठी महत्त्वाचे आहे. गडकरी म्हणाले की, गरिबांना मदत करण्यासाठी 'वन नेशन-वन रेशन कार्ड' लागू केले जात आहे. जेणेकरून प्रवासी मजुरांना अन्नधान्य सहज अन्नधान्य उपलब्ध होईल. प्रवासी मजुरांचे काही फोटो समोर आले आहेत, ते पायी आपापल्या राज्यांत जात असल्याचं दिसत आहे. मजुरांना समजवावं लागेल की, व्यवसाय सुरू होणार आहे. त्यांना रोजगार मिळणार आहे. तरीही एखाद्या मजुराला घरीच जायचं असल्यास त्याला सहीसलामत घरी पोहोचवं आवश्यक आहे. हे काम केंद्र आणि राज्य सरकारनं मिळून करणं आवश्यक आहे, असंही गडकरी म्हणाले आहेत.