CoronaVirus: कोरोना निगेटिव्ह माता, जन्माला आले पॉझिटिव्ह बाळ; डॉक्टरांच्या पायाखालची वाळूच सरकली
By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2021 08:06 PM2021-05-27T20:06:17+5:302021-05-27T20:06:54+5:30
Corona Virus shocking News: उत्तर प्रदेशच्या वाराणसीमध्ये खळबळजनक प्रकार घडला आहे. बीएचयूच्या सर सुंदरलाल हॉस्पिटलमध्ये प्रसुतीसाठी भरती झालेल्या महिलेने कोरोनाबाधित मुलीला (born corona Positive) जन्म दिला आहे.
Varanasi News: उत्तर प्रदेशच्या वाराणसीमध्ये खळबळजनक प्रकार घडला आहे. बीएचयूच्या सर सुंदरलाल हॉस्पिटलमध्ये प्रसुतीसाठी भरती झालेल्या महिलेने कोरोनाबाधित मुलीला (born corona Positive) जन्म दिला आहे. धक्कादायक बाब म्हणजे या महिलेला कोरोना झालेला नाही. तिची चाचणी निगेटिव्ह आली असली तरी देखील बाळ पॉझिटिव्ह जन्मल्याने कोरोनाचे हे रूप शास्त्रज्ञांनाही चकीत करून गेले आहे. डॉक्टरांनुसार सध्या आई, बाळ दोघांचीही प्रकृती चांगली आहे. (Pregnant women corona negative, gave birth corona positive child.)
चंदौलीची राहणारी सुप्रिया प्रजापति 24 मे रोजी बीएचयू हॉस्पिटलमध्ये दाखल झाली होती. ऑपरेशनच्या आधी तिची कोरोना चाचणी करण्यात आली. यामध्ये ती निगेटिव्ह असल्याचे समोर आले. यानंतर डॉक्टरांनी तिची प्रसुती केली. तिला कन्यारत्न झाले. डॉक्टरांनी खबरदारी म्हणून नवजात मुलीची कोरोना चाचणी केली. यामध्ये तिचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने डॉक्टरांच्या पायाखालची वाळूच सरकली आहे. हा रिपोर्ट पाहून मेडिकल सायन्सशी संबंधित वैज्ञानिकही हैरान झाले आहेत.
बीएचयु हॉस्पिटलचे अधीक्षक डॉ. के के गुप्ता यांनी सांगितले की, हॉस्पिटलमध्ये दाखल असलेली बाळ-बाळंतीन सुखरुप आहेत. आई कोरोना निगेटिव्ह आणि मुलगी पॉझिटीव्ह आल्याने त्यांची पुन्हा चाचणी केली जाणार आहे.
बीएचयूचे जीवशास्त्राचे प्राध्यापक ज्ञानेश्वर चौबे यांनी सांगितले की, हा जगभरातील विचित्र प्रकार आहे. नवजात अर्भक कोरोना पॉझिटिव्ह आहे, परंतू तिची आई निगेटिव्ह आहे. अशा स्थितीत त्यांची पुन्हा कोरोना चाचणी करण्यात यावी. अमेरिकेतही असा प्रकार झाला होता. दुसऱ्यांदा टेस्ट केल्यावर माता आणि बाळ निगेटिव्ह आले होते.