Coronavirus : नकारात्मकता, निराशावाद, अफवांना रोखण्याची गरज; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2020 02:07 AM2020-03-25T02:07:17+5:302020-03-25T05:27:30+5:30
Coronavirus : ‘‘सरकार ‘कोविड-१९’च्या परिणामांशी लढण्यासाठी कटिबद्ध आहे याची खात्री नागरिकांना देण्याचीही गरज आहे. राष्ट्रीय सुरक्षितता कायम राखण्यासाठी समाजातील एकवाक्यता सुधारणे खूप महत्त्वाचे आहे.’’
नवी दिल्ली : आज देश कोरोना विषाणूचा (कोविड-१९) फैलाव रोखण्यासाठी झटत असताना जनतेतील लढाऊ वृत्ती कायम राखणे अत्यावश्यक आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले. ते म्हणाले,‘‘नकारात्मकता, निराशावाद आणि अफवांना रोखण्याची गरज आहे.’’
मोदी यांनी मंगळवारी वृत्तपत्रांच्या वरिष्ठ पत्रकारांशी व्हिडिओ लिंक्सद्वारे संवाद साधला. त्यांनी सांगितले की, ‘‘सरकार ‘कोविड-१९’च्या परिणामांशी लढण्यासाठी कटिबद्ध आहे याची खात्री नागरिकांना देण्याचीही गरज आहे. राष्ट्रीय सुरक्षितता कायम राखण्यासाठी समाजातील एकवाक्यता सुधारणे खूप महत्त्वाचे आहे.’’ सरकार आणि जनता यांच्यात वृत्तपत्रांनी दुवा म्हणून काम करावे आणि राष्ट्रीय आणि प्रांतीय पातळ्यांवर सतत फीडबॅक द्यावा, असे मोदी यांनी संवादात म्हटले.
गर्दीपासून दूर राहण्याचे महत्व (सोशल डिस्टन्सिंग) अधोरेखीत करून मोदी यांनी प्रसार माध्यमांना राज्यांनी लॉक डाऊनचे जे निर्णय घेतले त्याचे महत्व व त्याबद्दलची जागरूकता निर्माण करावी, असे म्हटले. याशिवाय विषाणुचा फैलाव झाल्यास काय परिणाम होतात, त्यात आंतरराष्ट्रीय माहिती आणि इतर देशांनी जे प्रयत्न केले त्याची उदाहरणेही द्यावीत, असे म्हटले, असे पंतप्रधान कार्यालयाने (पीएमओ) जारी केलेल्या निवेदनात म्हटले.
नकारात्मकता, निराशावाद आणि अफवा यांच्याशी लढणेदेखील महत्वाचे आहे यावर मोदी यांनी भर दिला. मोदी यांनी सहभागी झालेल्यांचे फीडबॅकसाठी आभार मानून जे अधिकारांपासून वंचित आहेत त्यांच्याबद्दलच्या सामाजिक जबाबदारीची आठवणही करून
दिली.
देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यांत माहिती पोहोचवण्यासाठी प्रसारमाध्यमांनी प्रशंसनीय भूमिका पार पाडल्याचा उल्लेख मोदी यांनी केला. प्रसारमाध्यमांचे जाळे (नेटवर्क्स) हे देशव्यापी असून ते शहरे आणि खेड्यांत पोहोचले आहे. यामुळेच या विषाणुच्या आव्हानाशी लढताना व अतिशय सूक्ष्म पातळीवर माहिती पोहोचवण्यात म्हणूनच प्रसारमाध्यमांना आणखी महत्व आले आहे, असे नरेंद्र मोदी म्हणाले.
वृत्तपत्रांची विश्वासार्हता प्रचंड आहे
मोदी म्हणाले, वृत्तपत्रांची विश्वासार्हता प्रचंड आहे आणि प्रांतांमध्ये स्थानिक पानांना मोठा वाचकवर्ग आहे. म्हणून कोरोना व्हायरसबद्दलची जागरूकता या पानांवर लेख प्रसिद्ध करून निर्माण करणे अत्यावश्यक आहे.
या विषाणूची चाचणी करण्याची केंद्रे कुठे कुठे आहेत, कोणी चाचणी करून घेतली पाहिजे, चाचणी करून घेण्यासाठी कोणाशी संपर्क साधला पाहिजे आणि होम आयसोलेशनचे नियम पाळणे का आवश्यक आहे ही माहिती त्याद्वारे देणे आवश्यक आहे.
ही माहिती वृत्तपत्रांत आणि त्या वृत्तपत्राच्या वेब पोर्टल्सवर दिली गेली पाहिजे, असे मोदी म्हणाले. लॉकडाऊन असताना जीवनावश्यक वस्तू कोठे उपलब्ध आहेत त्या ठिकाणची माहितीही प्रांतीय पानांवर दिली जाऊ शकते, अशी सूचना त्यांनी केली.
१४ ठिकाणांहून जोडले गेले ११ भाषांचे वरिष्ठ पत्रकार
- पंतप्रधानांनी अतिशय परिणामकारकतेने देशाशी संवाद साधून व देशाला प्रखर नेतृत्व देऊन बजावलेल्या भूमिकेची पत्रकार आणि वृत्तपत्रांतील अन्य संबंधितांनी प्रशंसा केली. मोदी यांनी प्रेरणादायी व सकारात्मक घटना प्रकाशित करण्याच्या ज्या सूचना केल्या त्यानुसार काम केले जाईल, असेही ते म्हणाले.
वृत्तपत्रांची विश्वासार्हता अधिक बळकट केल्याबद्दल मोदी यांचे त्यांनी आभार मानले आणि आजच्या या गंभीर आव्हानाला तोंड देण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याचा त्यांनी जो संदेश दिला त्याची नोंद घेण्यात आली आहे, असे या निवेदनात म्हटले.
संपूर्ण देशातील वृत्तपत्रांचे २० पेक्षा जास्त पत्रकार आणि हितसंबंधींनी नरेंद्र मोदी यांच्याशी व्हिडिओ लिंक्सद्वारे संवाद साधला. या संवादाशी राष्ट्रीय आणि विभागीय पातळीवरील ११ भाषांचे वरिष्ठ पत्रकार १४ ठिकाणांहून जोडले गेले होते.
प्रिंट मीडियाचे महत्व केले अधोरेखित
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना असे वाटते की, इलेक्ट्रॉनिक मीडियातील बातम्या जरी लोक पाहत असतील तरी प्रिंट मीडियातील बातम्या वाचल्या जातात. तथापि, लोकांना घाबरविण्याची गरज नाही. काळजी करण्याची मात्र गरज आहे. मोदी यांनी असेही आवाहन केले आहे की, प्रत्येकाने आपले मनोबल उंचाविण्याची गरज आहे.
बातम्या लोकांपर्यंत पोहचविणे हे लक्ष्य असले तरी मीडियाचे एक सामाजिक दायित्व आहे. तसेच, प्रिंट मीडियातील वरिष्ठ पत्रकारांशी संवाद साधताना मोदी यांनी प्रिंट मीडियाचे महत्वही अधोरेखित केले आहे. कोरोनाशी कशाप्रकारे सामना करता येईल, यासाठी लोकांची केवळ मानसिकता तयार करणे नव्हे तर, एकजूट करणे हा सरकारचा हेतू आहे. प्रशासन आणि जनता यांच्यामध्ये एक दुवा म्हणून मीडिया काम करतो. हा दुवा अधिक प्रभावी बनविण्याचा पंतप्रधान मोदी यांचा प्रयत्न आहे. लोकांचा वर्तमानपत्रांवर विश्वास आहे आणि या माध्यमातून प्रचार झाला तर फायदा होईल, असे मोदी यांना वाटते. कोरोनाविरुद्ध सरकार जी लढाई लढत आहे त्यात त्यांना प्रिंट मीडियाची साथ हवी आहे. कारण, कोरोनाला रोखण्यासाठी आगामी एक ते दीड महिना अतिशय महत्वाचा आहे.
धार्मिक सण- उत्सवासाठी लोकांनी एकत्र येऊन जीव धोक्यात घालू नये, असे सरकारला वाटते. पंतप्रधान मोदी यांनी लोकांना जनता कर्फ्यूचे आवाहन केले होते. त्यानंतर लोकांनी त्याला भरभरुन प्रतिसाद दिला. या काळात गरीब लोकांसाठी सरकार काही उपाययोजना करत आहे. त्या योजना योग्य पद्धतीने राबविल्या जात आहेत काय? याचा फिडबॅक प्रिंट मीडियाकडून यावा अशी मोदी यांची अपेक्षा आहे.