coronavirus: दिलासादायक! देशभरात कोरोनाच्या नव्या रुग्णसंख्येत पुन्हा मोठी घट, दिवसभरात सापडले एवढे रुग्ण
By बाळकृष्ण परब | Published: November 16, 2020 10:47 AM2020-11-16T10:47:27+5:302020-11-16T10:50:49+5:30
CoronaVirus Positive News : गेल्या चार महिन्यांतील एका दिवसात सापडलेली सर्वात कमी रुग्ण संख्या आहे. यापूर्वी १५ जुलै रोजी देशात २९ हजार ४२९ रुग्णांची नोंद झाली होती.
नवी दिल्ली - दिवाळीमुळे वाढलेली गर्दी, प्रदूषण, राजधानी दिल्लीमध्ये वाढत असलेली कोरोनाच्या रुग्णांची संख्या, देशात कोरोनाची दुसरी लाट येणार असल्याची तज्ज्ञांकडून व्यक्त होत असलेली भीती, या पार्श्वभूमीवर ऐन दिवाळीत कोरोनाविरोधात देशासाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. गेल्या २४ तासांमध्ये देशातील कोरोनाच्या रुग्णसंख्येमध्ये कमालीची घट दिसून आली आहे. गेल्या २४ तासांत देशभरात कोरोनाच्या ३० हजार ५४८ नव्या रुग्णांची नोंद झाली. गेल्या चार महिन्यांतील एका दिवसात सापडलेली सर्वात कमी रुग्ण संख्या आहे. यापूर्वी १५ जुलै रोजी देशात २९ हजार ४२९ रुग्णांची नोंद झाली होती.
आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या मादितीनुसार, गेल्या २४ तासांत देशभरात कोरोनाचे ३० हजार ५४८ नवे रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाच्या एकूण रुग्णांची संख्या ही ८८ लाख ४५ हजार १२७ वर पोहोचली आहे. तर गेल्या दिवसभरात देशात ४३५ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील मृतांची एकूण संख्या १ लाख ३० हजार ०७० एवढी झाली आहे.
With 30,548 new #COVID19 infections, India's total cases rise to 88,45,127. With 435 new deaths, toll mounts to 1,30,070
— ANI (@ANI) November 16, 2020
Total active cases at 4,65,478 after a decrease of 13,738 in the last 24 hrs
Total discharged cases at 82,49,579 with 43,851 new discharges in last 24 hrs pic.twitter.com/7zRLIB7VCM
तसेच गेल्या २४ तासांमध्ये देशभरात ४३ हजार ८५१ रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे देशभरातील एकूण कोरोनामुक्त रुग्णांचा आकडा हा ८२ लाख ४९ हजार ५७९ वर पोहोचला आहे. तर सध्याच्या घडीला देशात कोरोनाचे ४ लाख ६५ हजार ४७८ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. देशातील अॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येतही सातत्याने घट होत असल्याने ही दिलासादायक बाब मानली जात आहे.
दरम्यान, कोरोना व्हायरसने गेल्या आठ ते नऊ महिन्यांपासून भारतासह संपूर्ण जगभरात कहर केला आहे. कोरोना व्हायरसची लस कधी तयार होणार याकडे संपूर्ण जगभरातील लोकांचे लक्ष आहे. कोरोना व्हायरसपासून बचावासाठी संपूर्ण जगभरातील वैज्ञानिक आणि डॉक्टर प्रयत्न करत आहेत. अशा स्थितीत कोरोनाच्या संक्रमणाबाबत तसंच लसीकरणाबाबत एक सकारात्मक माहिती समोर येत आहे. कोरोनाबाधित रुग्णांची घटती संख्या पाहून एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी देशात कोरोनाची लस येण्याआधीच भारतीयांना कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी लागणारी इम्युनिटी तयार होईल असा दावा केला आहे.
दिल्लीप्रमाणेच भारतातील इतर राज्यात वाढत जाणारं प्रदूषण, दिवाळीची एकूण परिस्थिती पाहता कोरोनाचा विळखा अधिक घट्ट होण्याची चिंता व्यक्त केली जात आहे. याशिवाय थंडीमुळे पुन्हा एकदा कोरोनाग्रस्तांचा आकडा वेगानं वाढू शकतो असं काही तज्ज्ञांचं म्हणणं असतानाच एम्सच्या डॉक्टरांनी केलेला दावा हा दिलासादायक ठरत आहे. कोरोनाबाबत माहिती देताना डॉ. एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी सांगितले की, ''आपण ज्या प्रकारचा ट्रेंड पाहत आहोत. ते पाहिल्यानंतर आपण असे म्हणू शकतो की देशात कोरोनाची लस येण्याआधी भारतीयांची प्रतिकारशक्ती विकसित होऊ शकते. कोरोनाचे स्वरुप कदाचित बदलणार नाही.''