Coronavirus: कोरोनाबाधितांवर नवं संकट, म्युकरमायकोसिसनंतर आता दिसून येताहेत हे आजार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2021 03:31 PM2021-06-02T15:31:12+5:302021-06-02T15:31:36+5:30
Coronavirus in India: कोरोनाबाधित रुग्णांमध्ये म्युकरमायकोसिस हा आजार मोठ्या प्रमाणात दिसून आल्याने वैद्यकीय तज्ज्ञ चिंता व्यक्त करत आहेत. त्यातच आता कोरोनाबाधित रुग्णांवर नवे संकट आल्याचे दिसत आहे.
नवी दिल्ली - दुसऱ्या लाटेदरम्यान कोरोनाबाधित रुग्णांमध्ये म्युकरमायकोसिस हा आजार मोठ्या प्रमाणात दिसून आल्याने वैद्यकीय तज्ज्ञ चिंता व्यक्त करत आहेत. त्यातच आता कोरोनाबाधित रुग्णांवर नवे संकट आल्याचे दिसत आहे. (Coronavirus in India) कोरोनाच्या रुग्णांमध्ये आतड्यांमध्ये गुठळ्या होणे, तसेच गँगरिनसारख्या समस्याही दिसून येऊ लागल्या आहेत. त्यामुळे तज्ज्ञ पोटात होणाऱ्या अज्ञात दुखण्याच्या कारणांचा तत्काळ तपास करण्यास सांगत आहेत. आयसीएमआरने देशभरातील स्वतंत्र संशोधकांना कोरोनासंबंधितीच्या माहितीमध्ये त्यांच्याकडील माहितीची भर घालण्यासाठी निमंत्रित केले होते. (A new crisis on corona Patient, The risk of gangrene increased, with cases of intestinal clots appearing)
टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, मुंबईतील रुग्णालयांमध्ये फिजिशियन्स आणि सर्जन्सनी अशा एक डझनाहून अधिक रुग्णांवर उपचार केले आहेत. त्यांनी पोटात होणाऱ्या अज्ञात वेदनांबाबत इशारा दिला आहे. तसेच त्वरित तपासणीचा सल्ला दिला आहे. संशोधनातून समोर आलेल्या माहितीनुसार १६ ते ३० टक्के कोविड-१९ च्या रुग्णांमध्ये गॅस्ट्रोइन्टेस्टेनल लक्षणेही दिसून येत आहेत. ही लक्षणे अगदी सौम्य दिसतात किंवा दिसूनही येत नाहीत.
कोरोना विषाणू हा फुप्फुसांप्रमाणेच गॅस्ट्रोइन्टेस्टेनल ट्रॅक्टवरही हल्ला करू शकतो. दुर्मीळ रुग्णांमध्ये कोविडमुळे आतड्यांत गुठळ्या झालेल्या दिसून येतात. त्यांना एक्यूट मेसेन्ट्रिक इस्कीमिया म्हटले जाते. एएमआयमुळे छोट्या आतड्यांतील रक्ताच्या पुरवठ्यावर परिणाम होतो. त्यामुळे गँगरिनची समस्याही निर्माण होऊ शकते.
आतड्यांमध्ये गुठळ्या झाल्याची तक्रार करणारे रुग्ण गंभीर मेसेन्टेरिक इस्किमियाची शिकार होऊ शकतात. ही पोटाशी संबंधित दुर्मीळ संस्या आहे. ती आजार आणि मृत्यूदराच्या उच्चस्तराशी संबंधित आहे. वेस्क्यूलर सर्जन डॉक्टर अनिरुद्ध भुईया यांनी सांगितले की, जर यावर त्वरित उपचार केले नाहीत तर ते धोकादायक ठरू शकते.
आकडे सांगतात की, देशामध्ये म्युकरमायकोसिसचे रुग्ण मोठ्या प्रमाणात सापडत आहेत. आतापर्यंत १२ हजारांहून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच देशात असे अनेक रुग्ण असतील ज्यांची नोंद झालेली नाही, अशी भीतीही व्यक्त केली जात आहे. केंद्र सरकारसुद्धा या आजाराच्या उपचारांमध्ये वापरल्या जाणाऱ्या एम्फोटेरेसिन बी ची व्यवस्था वाढवण्यात गुंतले आहे.