CoronaVirus: मुंबई आयआयटीत नवे सत्र ऑनलाइन पद्धतीने होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2020 04:15 AM2020-06-26T04:15:58+5:302020-06-26T04:16:55+5:30
नव्या शैक्षणिक सत्रात विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण देण्यात येईल. या निर्णयाचे देशातील इतर आयआयटी अनुकरण करण्याची शक्यता आहे.
नवी दिल्ली : देशामध्ये कोरोना संसर्गाने माजविलेला हाहाकार लक्षात घेता इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) मुंबईने येत्या डिसेंबरपर्यंत प्रत्यक्ष वर्ग न घेण्याचे ठरविले आहे. त्यामुळे नव्या शैक्षणिक सत्रात विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण देण्यात येईल. या निर्णयाचे देशातील इतर आयआयटी अनुकरण करण्याची शक्यता आहे.
विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांच्याच आरोग्याची सुरक्षा लक्षात घेऊन आयआयटी मुंबईने हे पाऊल उचलले आहे. शैक्षणिक सत्राला सुरुवात होऊनही कॅम्पसमध्ये विद्यार्थी प्रत्यक्ष हजर नाहीत, असा प्रसंगही आयआयटीच्या इतिहासात पहिल्यांदाच पाहायला मिळणार आहे. नवे शैक्षणिक सत्र जुलैच्या प्रारंभी सुरू होऊन डिसेंबर अखेरीस संपेल. आयआयटी मुंबईचे संचालक शुभाशिष चौधरी यांनी सांगितले की, नव्या शैक्षणिक सत्रात विद्यार्थ्यांना आॅनलाइनद्वारे शिकवावे हा निर्णय सिनेटमधील सविस्तर चर्चेनंतर घेण्यात आला.
विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याच्या पद्धतीबद्दल कोरोनाच्या साथीमुळे पुनर्विचार करण्याची वेळ आली आहे. नवे शैक्षणिक वर्ष सुरू होण्यास आणखी विलंब होऊ नये म्हणून आॅनलाइन शिक्षणाचा पर्याय स्वीकारण्यात आला. आॅनलाइन वर्ग कधी भरणार, याचा तपशील विद्यार्थ्यांना लवकरच कळविण्यात येईल. आयआयटीमध्ये शिकायला येणाऱ्या मुलांपैकी अनेक मुले दुर्बल घटकांतून आलेली असतात. आॅनलाइन शिक्षणासाठी लागणाºया साधनांसाठी या विद्यार्थ्यांना समाजातील दानशूर व्यक्ती, संस्थांनी मदत केली पाहिजे. देशात कोरोना संसर्गाच्या फैलावामुळे नवे शैक्षणिक वर्ष कधीपासून सुरू करावे, याबद्दल केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालय संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करत आहे.