CoronaVirus News: देशात चार दिवसांत नव्या १ लाख कोरोनाबाधित रुग्णांची वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2020 10:59 PM2020-07-18T22:59:15+5:302020-07-19T06:12:32+5:30
राज्यांमध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण व बळी महाराष्ट्रामध्येच आहेत.
नवी दिल्ली : देशात शनिवारी कोरोनाचे ३४,८८४ नवे रुग्ण आढळून आले असून ही आतापर्यंतची सर्वाधिक वाढ आहे. एकूण रुग्णांची संख्या १०,३८,७१६ झाली असून आणखी ६७१ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे बळींची एकूण संख्या आता २६,२७३ वर पोहोचली आहे. मागील अवघ्या चार दिवसांतच एक लाख नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.
केंद्रीय आरोग्य खात्याने सांगितले की, देशात ३,५८,६९२ रुग्णांवर उपचार सुरू असून ६,५३,७५० रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. एकूण रुग्णांपैकी कोरोना आजारातून बरे झालेल्यांचे प्रमाण ६२.९४ टक्के आहे. सलग तिसऱ्या दिवशी ३० हजारांपेक्षा अधिक रुग्ण सापडले आहेत. सर्वाधिक रुग्णसंख्या असलेल्या देशांत अमेरिका, ब्राझिलपाठोपाठ भारत तिसºया क्रमांकावर आहे.
राज्यांमध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण व बळी महाराष्ट्रामध्येच आहेत. शनिवारी बळी गेलेल्या ६७१ जणांमध्ये महाराष्ट्रातील २५८, कर्नाटकमधील ११५, तमिळनाडूतील ७९, आंध्र प्रदेशमधील ४२, उत्तर प्रदेशमधील ३८, पश्चिम बंगाल, दिल्लीमधील प्रत्येकी २६, गुजरातमधील १७, जम्मू-काश्मीर व पंजाबमधील प्रत्येकी ९, मध्य प्रदेश व राजस्थानमधील प्रत्येकी ८ जणांचा समावेश आहे. तसेच तेलंगणामध्ये ७, हरयाणात ५, झारखंड, बिहार, ओदिशामध्ये प्रत्येकी चार, आसाम, पुडुचेरीमध्ये प्रत्येकी तीन, छत्तीसगढ, गोवामध्ये प्रत्येकी दोन, केरळ व उत्तराखंडमध्ये प्रत्येकी एकाचा कोरोनामुळे शनिवारी बळी गेला.
देशात सर्वाधिक बळी महाराष्ट्रात असून त्यांची संख्या ११,४५२ आहे. बळींची एकूण संख्या दिल्लीत ३७५१, तमिळनाडूत २३१५, गुजरातमध्ये २१०६, कर्नाटकात ११४७, उत्तर प्रदेशामध्ये १०८४, प. बंगालमध्ये १०४९, मध्य प्रदेशमध्ये ६९७ व राजस्थानमध्ये ५४६ इतकी आहे. बळींपैकी ७० टक्क्यांपेक्षा अधिक रुग्णांना एकापेक्षा जास्त व्याधी होत्या. महाराष्ट्रामध्ये शनिवारी रुग्णसंख्या २,९२,५८९ झालीे. तमिळनाडूत १,६०,९०७, दिल्लीमध्ये १,२०,१०७, कर्नाटकमध्ये ५५,११५, गुजरातमध्ये ४६,४३० रुग्ण आहेत.
चाचण्या १ कोटी ३४ लाखांवर
इंडियन कौन्सिल फॉर मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) या संस्थेने म्हटले आहे की, देशात शुक्रवारी कोरोना चाचण्यांची संख्या १,३४,३३,७४२ वर पोहोचली आहे. शुक्रवारी देशभरात कोरोनाच्या ३,६१,०२४ कोरोनाच्या चाचण्या करण्यात आल्या होत्या.