CoronaVirus News: १० दिवसांत वाढले ५० हजार रुग्ण साथीचा विळखा आणखी घट्ट; देशात सर्वाधिक बळी गेले महाराष्ट्रात
By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2020 11:34 PM2020-05-27T23:34:51+5:302020-05-27T23:35:56+5:30
केंद्रीय आरोग्य खात्याच्या सूत्रांनी सांगितले की, देशातील कोरोना बळींची संख्या चार हजारांपेक्षा अधिक झाली आहे.
नवी दिल्ली : कोरोना विषाणूने देशात माजविलेला हाहाकार कमी होण्याची चिन्हे नसून, तिथे आता या आजाराच्या रुग्णांची एकूण संख्या १ लाख ५५ हजारांवर पोहोचली आहे. सोमवारी कोरोना रुग्णांच्या संख्येत ६ हजारांहून अधिक जणांची भर पडली होती. गेल्या दहा दिवसांत कोरोना रुग्णांची संख्या एक लाखाहून दीड लाखावर गेली हीदेखील चिंताजनक बाब आहे.
यासंदर्भात केंद्रीय आरोग्य खात्याच्या सूत्रांनी सांगितले की, देशातील कोरोना बळींची संख्या चार हजारांपेक्षा अधिक झाली आहे. सोमवारी १४६ जणांचा या आजाराने मृत्यू झाला. त्यामध्ये महाराष्ट्रातील ६०, गुजरातमधील ३०, दिल्लीतील १५, मध्यप्रदेशमधील १०, तामिळनाडूतील सात, पश्चिम बंगालमधील सहा, उत्तर प्रदेश व राजस्थानमधील प्रत्येकी चार, तेलंगणामधील ३, हिमाचल प्रदेश, कर्नाटक, जम्मू-काश्मीरमधील प्रत्येकी दोन, केरळमधील एका रुग्णाचा समावेश होता.
देशात कोरोनाचा पहिला रुग्ण ३० जानेवारीला आढळला होता. या साथीच्या फैलावाचा वेग फेब्रुवारी महिन्यात काहीसा कमी झाला होता. गेल्या २७ दिवसांत कोरोनाचे एक लाखांहून अधिक रुग्ण आढळले आहेत. महाराष्ट्रामध्ये कोरोनाचे सर्वाधिक बळी गेले असून, त्यानंतर गुजरात, मध्यप्रदेश, पश्चिम बंगाल, दिल्ली, राजस्थान, उत्तर प्रदेश, तामिळनाडू यांचा क्रमांक लागतो.
लॉकडाऊनची मुदत वाढविणार असल्याची चर्चा
31 मे रोजी लॉकडाऊनचा चौथा टप्पा संपत आहे. या कालावधीतही देशातील कोरोना रुग्णांचा आकडा वाढतोच आहे. ईशान्य भारतातदेखील कोरोना साथीने पुन्हा हातपाय पसरले आहेत. त्यामुळे केंद्र सरकार लॉकडाऊनच्या मुदतीत आणखी वाढ करण्याची शक्यता असल्याची चर्चा लोकांमध्ये सुरू झाली आहे. त्याचे पडसाद समाजमाध्यमांतही उमटत आहेत.