Coronavirus News पूर्णत: भारतात तयार झालेले १३४० व्हेंटिलेटर्स राज्यांना सुपूर्द
By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2020 08:59 AM2020-06-24T08:59:06+5:302020-06-24T09:36:41+5:30
पीएम केअर फंडात ३१०० कोटी रुपयांचा निधी; त्यातील २००० कोटी व्हेंटिलेटरवर खर्च होणार
नवी दिल्ली : संपूर्णपणे भारतात तयार झालेल्या १३४० व्हेंटिलेटर्सचे विविध राज्यांना वाटत करण्यात आले असून, त्यापैकी २७५ एकट्या महाराष्ट्राला मिळाले आहेत. पीएम केअर्स फंडातून ५० हजार व्हेंटिलेटर्स तयार करण्याची योजना केंद्र सरकारने आखली आहे.
कोरोनाच्या अनेक रुग्णांना प्रसंगी व्हेंटिलेटर्सवर ठेवावे लागते. त्यामुळे त्यांची कमतरता भासू नये, यासाठी भारतातच व्हेंटिलेटर्स तयार करण्यात येत आहेत. कोरोनाविरुद्धच्या लढाईसाठी ३१०० कोटी रुपयांचा पीएम केअर फंड असून, त्यापैकी दोन हजार कोटी रुपयांतून हे व्हेंटिलेटर्स देशात तयार करण्यात येत आहेत. आतापर्यंत भारतात २९२३ व्हेंटिलेटर्स तयार करण्यात आले आहेत आणि त्यापैकी १३४० चे वाटप विविध राज्यांना केले आहे.
महाराष्ट्राप्रमाणेच दिल्लीलाही २७५ व्हेंटिलेटर्स देण्यात आले आहेत आणि गुजरात (१७५), बिहार (१००), कर्नाटक (९०) व राजस्थान (७५) असे व्हेंटिलेटर्स दिली. जे ५० हजार व्हेंटिलेटर्स बनवण्यात येणार आहेत, त्यातील ३० हजार भारत इलेक्ट्रॉनिक तयार करणार आहे. अॅग्वा हेल्थकेअरकडून १० हजार व्हेंटिलेटर्स तयार करून घेतले जातील. याखेरीज एएमटीझेड बेसिक) ४५५०, एएमटीझेड एंड ४००० तर अलाइड मेडिकल ही कंपनी ३५० व्हेंटिलेटर्स तयार करणार आहे.
कोरोनाविरुद्धच्या लढ्यासाठी पीएम केअर फंड निर्माण करण्यात आला असून, त्यातून परप्रांतीय मजुरांच्या मदतीसाठी सुमारे एक हजार कोटी रुपये देण्यात आले आहेत. राज्याची लोकसंख्या, तेथील कोरोनाची स्थिती याआधारे या फंडमधून रक्कम दिली जाते. आतापर्यंत महाराष्ट्राला १८१ कोटी रुपयांचे अनुदान देण्यात आले आहे. उत्तर प्रदेशला १०३ कोटी, तमिळनाडूला ८३ कोटी, गुजरातला ६६ कोटी, दिल्लीला ५५ कोटी, पश्चिम बंगालला ५३ कोटी, बिहारला ५१ कोटी, मध्य प्रदेशला ५० कोटी, राजस्थानला ५० कोटी, कर्नाटकला ३४ कोटी रुपये दिले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरोना विरुद्धच्या लढाईसाठी पीएम केअर्सची (पीएम सिटिझन असिस्टन्स अँड रीलिफ इन इमर्जन्सी सिच्युएशन्स फंड) स्थापना केली. २७ मार्चला पीएम केअर्सची स्थापना करण्यात आली. पंतप्रधान मोदी पीएम केअर्सचे प्रमुख आहेत. याशिवाय या ट्रस्टमध्ये संरक्षणमंत्री, गृहमंत्री आणि अर्थमंत्र्यांचा समावेश आहे. कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी देशवासीयांनी पीएम केअर्समध्ये दान करावं, असं आवाहन पंतप्रधान मोदींनी केलं होतं. त्याला देशाच्या जनतेनं प्रतिसादही दिला.
देशातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. गेल्या काही दिवसांपासून दर दिवशी कोरोनाचे १४ हजार रुग्ण आढळून येत आहे. देशातील कोरोना रुग्णांचा आकडा साडे चार लाखांच्या पुढे गेला आहे. यातील सव्वा लाखांहून अधिक रुग्ण एकट्या महाराष्ट्रातील आहेत. दिल्लीतील कोरोना रुग्णांची संख्या गेल्या काही दिवसांत अतिशय झपाट्यानं वाढली आहे. दिल्लीत कोरोनाचे ६६ हजार रुग्ण आहेत. त्यानंतर तमिळनाडूचा क्रमांक लागतो. तमिळनाडूतील कोरोना बाधितांचा आकडा ६४ हजार इतका आहे. यानंतर गुजरात (२८ हजार), उत्तर प्रदेश (१८ हजार), राजस्थान (१५ हजार), पश्चिम बंगाल (१४ हजार), मध्य प्रदेश (१२ हजार), हरयाणा (११ हजार) ही राज्यं येतात.
(फेसबुकने या उपक्रमासाठी आमच्यासोबत भागीदारी केली आहे, मात्र या मजकुरावर त्यांचे कुठलेही संपादकीय नियंत्रण अथवा प्रभाव नाही.)