CoronaVirus News: इंडियन मेडिकल असोसिएशनच्या १९६ डॉक्टरांचा कोरोनामुळे बळी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2020 02:59 AM2020-08-10T02:59:00+5:302020-08-10T02:59:18+5:30
राज्यातील २३ डॉक्टरांचा बळी; इंडियन मेडिकल असोसिएशनचे पंतप्रधान मोदींना पत्र
मुंबई : इंडियन मेडिकल असोसिएशनच्या तब्बल १९६ डॉक्टरांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोविड योद्ध्यांसाठी ही चिंतेची बाब असून यानिमित्ताने सर्व परिस्थितीची माहिती देणारे पत्र इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए)ने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ७ आॅगस्टला लिहिले आहे.
डॉक्टरांचे मृत्यू रोखण्यासाठी त्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी पत्रात केल्याची माहिती आयएमएचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. राजन शर्मा यांनी दिली. आयएमए अहवालातील माहितीनुसार, कोरोनाग्रस्त डॉक्टरांना खाट व औषधे उपलब्ध होण्यात अडथळे निर्माण होत असल्याची माहिती स्वत: डॉक्टर आणि त्यांच्या कुटुंबीयांनी दिली आहे.
महिनाभरापूर्वी आयएमएने जाहीर केलेल्या माहितीनुससार, देशात ९९ डॉक्टर कोरोनाने दगावले होते. आता हा आकडा वाढून १९६ वर गेला आहे. दरम्यान, १९६ डॉक्टरांमध्ये १७० डॉक्टर हे ५० वयोगटाच्या पुढचे आहेत.
डॉक्टर आणि त्यांच्या कुटुंबाची काळजी घेण्यासाठी काही तरी पर्यायी व्यवस्था करावी, अशी मागणी केल्याचे डॉ. शर्मा म्हणाले. सरकारी डॉक्टर-कर्मचाऱ्यांना आरोग्य विमा मिळतो, पण खासगी डॉक्टरही जीवाची पर्वा न करता रुग्णसेवा देत असून तेही मृत्युमुखी पडत आहेत. तेव्हा त्यांनाही ५० लाखांचा आरोग्य विमा लागू करावा, अशीही मागणी या पत्रात आहे.
कोरोनामुळे मरण पावलेल्या डॉक्टरांची राज्यनिहाय आकडेवारी
दिल्ली-१२ महाराष्ट्र-२३
गुजरात-२३ तामिळनाडू-४३
बिहार-१५ आंध्रप्रदेश-१२