CoronaVirus News: आजवरचा उच्चांक, 3 लाख 86 हजार नवे रुग्ण; चोवीस तासांत ३४९८ जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2021 06:27 AM2021-05-01T06:27:47+5:302021-05-01T06:30:02+5:30
चोवीस तासांत ३४९८ जणांचा मृत्यू : ३१ लाख ७० हजार सक्रिय रुग्ण
नवी दिल्ली : देशामध्ये शुक्रवारी कोरोनाचे ३ लाख ८६ हजार नवे रुग्ण आढळून आले असून हा आजवरचा उच्चांक आहे. गेल्या चोवीस तासांत या संसर्गामुळे ३४९८ जणांचा बळी गेला आहे. देशात कोरोनाचे १ कोटी ८७ लाख रुग्ण असून त्यातील १ कोटी ५३ लाख जण बरे झाले.
कोरोना रुग्णांची एकूण संख्या १,८७,६२,९७६ असून त्यापैकी १,५३,८४,४१८ जण बरे झाले. शुक्रवारी कोरोनाचे ३,८६,४५२ नवे रुग्ण सापडले व २,९७,५४० जण बरे झाले. देशात कोरोनामुळे आजवर २ लाखांवर मृत्यू झाले आहेत, तर उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या ३१ लाख ७० हजार २२८ आहे. या संसर्गातून बरे झालेल्यांचे प्रमाण ८२ टक्के आहे.
अमेरिकेमध्ये ३ कोटी ३० लाख कोरोना रुग्ण असून त्यातील २ कोटी ५६ लाख जण बरे झाले आहेत तर ५ लाख ८९ हजार लोकांचा बळी गेला. त्या देशात ६८ लाख १३ हजार कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. भारतापेक्षा कोरोना बळींची संख्या ब्राझिलमध्ये अधिक आहे. ब्राझिलमध्ये १ कोटी ४५ लाख कोरोना रुग्ण असून त्यातील १ कोटी ५३ लाख जण बरे झाले आहेत. त्या देशात चार लाख लोक या संसर्गाने मरण पावले.
जगात १५ कोटी रुग्ण
जगभरात कोरोना रुग्णांची संख्या १५ कोटींवर पोहोचली आहे. त्यातील १२ कोटी ८६ लाख जण बरे झाले तर आतापर्यंत ३१ लाख ८१ हजार लोकांचा बळी गेला. जगात सध्या १ कोटी ८८ लाख रुग्णांवर उपचार सुरूआहेत.