CoronaVirus News: देशातील नव्या रुग्णांमध्ये 50% महाराष्ट्रातील; राज्यात पुन्हा धोक्याचे संकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2021 01:02 AM2021-02-24T01:02:19+5:302021-02-24T01:02:32+5:30
विकास झाडे नवी दिल्ली : देशातील नवीन कोरोना रुग्णांमध्ये सरासरी ५० टक्के रुग्ण हे एकट्या महाराष्ट्रातील आहेत. अन्य राज्यातील ...
विकास झाडे
नवी दिल्ली : देशातील नवीन कोरोना रुग्णांमध्ये सरासरी ५० टक्के रुग्ण हे एकट्या महाराष्ट्रातील आहेत. अन्य राज्यातील रुग्णांची संख्या कमी होत असताना महाराष्ट्रात पुन्हा धोक्याचे संकेत मिळत आहेत.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या गेल्या दहा दिवसांच्या नवीन कोरोना रुग्णांंच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास असे लक्षात येते की, सर्वाधिक भयावह स्थिती ही महाराष्ट्राची आहे. देशभरात दररोज १० ते १५ हजार कोरोना रुग्णांची नोंद होत आहे. गेल्या २४ तासांत १० हजार ५४८ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यापैकी ५ हजार २१० रुग्ण हे एकट्या महाराष्ट्रातील आहे.
सोमवारच्या तुलनेत मंगळवारचे देशातील आकडे दिलासादायक होते. सोमवारी १४ हजार २०० रुग्णांची नोंद झाली होती. आज हा आकडा ३ हजार ७०० नी कमी झाला आहे. कोरोनाबाधितांच्या संख्येपेक्षा कोरोनामुक्तांची संख्या सोमवारी अधिक होती, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे.
गेल्या २४ तासांत १३ हजार २५५ रुग्णांनी कोरोनावर मात मिळविली. दरम्यान, ७८ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला. देशातील एकूण कोरोना रुग्णसंख्या त्यामुळे १ कोटी १० लाख १६ हजार ४३४ झाली आहे. त्यातील १ कोटी ७ लाख १२ हजार ६६५ रुग्णांनी कोरोनावर मात मिळविली आहे. १ लाख ४७ हजार ३०६ रुग्णांवर (१.३४ टक्के) उपचार सुरू आहेत. १ लाख ५६ हजार ४६३ रुग्णांचा (१.४२ टक्के) कोरोनाने मृत्यू झाला.मंगळवारी देशाचा कोरोनामुक्ती दर ९७.२४ टक्के नोंदविण्यात आला. गेल्या २४ तासांत केरळमध्ये २ हजार २१२ रुग्ण आढळले. दरम्यान, महाराष्ट्रात १८, केरळ १६, पंजाब १५ तसेच तामिळनाडूत सर्वाधिक ६ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला.
देशात आतापर्यंत २१ कोटी २२ लाख ३० हजार ४३१ कोरोना तपासण्या करण्यात आल्या आहेत. त्यातील ६ लाख ७८ हजार ६८५ तपासण्या या सोमवारी करण्यात आल्याची माहिती आयसीएमआरकडून देण्यात आली आहे. देशात आतापर्यंत १ कोटी १४ लाख २४ हजार ९४ कोरोना योद्ध्यांना कोरोना लस देण्यात आली आहे. त्यातील ३ लाख ७ हजार २३८ लसी या सोमवारी देण्यात आल्याची माहिती आयसीएमआरकडून देण्यात आली आहे.