CoronaVirus News: अनलॉकच्या आधी ७० टक्के ज्येष्ठांचे लसीकरण हवे -भार्गव
By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2021 06:14 AM2021-06-02T06:14:05+5:302021-06-02T06:14:25+5:30
CoronaVirus News: भार्गव म्हणाले की, ज्येष्ठ नागरिकांशिवाय ४५ वयाच्या पुढील व गंभीर आजारी असलेल्या किमान ७० टक्के लोकांचे लसीकरण झाल्यानंतरच अनलॉक केले जावे.
नवी दिल्ली : राज्यांनी ६० पेक्षा जास्त वयाच्या कमीत कमी ७० टक्के ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण करूनच अनलॉक करावे, असा सल्ला आयसीएमआरचे महासंचालक बलराम भार्गव यांनी दिला.
भार्गव म्हणाले की, ज्येष्ठ नागरिकांशिवाय ४५ वयाच्या पुढील व गंभीर आजारी असलेल्या किमान ७० टक्के लोकांचे लसीकरण झाल्यानंतरच अनलॉक केले जावे. अनलॉकनंतर कोरोना संक्रमणात थोड़ी वाढ होऊ शकते अशी शंका व्यक्त करून भार्गव म्हणाले, आरोग्य सेवांना सध्याच्या अवस्थेत अनलॉकमध्येही कायम ठेवले जावे.
अनलॉक अशा ठिकाणी केले जावे जेथे संक्रमणाचा दर सलग सात दिवस पाच टक्क्यांच्या कमी असेल. अनलॉकमध्येही मास्क आणि सामाजिक अंतर नियमांचे पालन झाले पाहिजे. लसीबद्दल गावागावांत होत असलेल्या चुकीच्या प्रचारावर डॉ. भार्गव म्हणाले, आधी शहरांत अशा अफवा होत्या. तेथे आता लोक लस घेण्यासाठी पळापळ करीत आहेत.
एली लिलीच्या औषधास मंजुरी
अमेरिकेतील औषधी कंपनी एली लिली यांना कोरोनावरील उपचारासाठी भारतात औषधांच्या आपत्कालीन उपचारास परवानगी मिळाली आहे.
बामलानिविमॅब ७०० मि.ग्रॅ. आणि एटेसेविमॅब १४०० मि.ग्रॅ. या औषधांच्या एकीकरणास मंजुरी देण्यात आली आहे. या कंपनीचे भारतासाठीचे कार्यकारी संचालक लुका विसीनी यांनी सांगितले की, भारतातील आरोग्य सुविधांसाठी आणि उपचारांसाठी आमच्याकडे एक पर्याय आहे. हे औषध १२ वर्षांवरील, ४० किलोपेक्षा अधिक वजन असलेल्यांना दिले जाते.
या औषधाचा उपयोग केवळ आरटीपीसीआर चाचणी पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांवर केला जातो. याशिवाय हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असलेल्या गंभीर रुग्णांनाही हे इंजेक्शन दिले जाईल. मात्र, जे रुग्ण ऑक्सिजनवर आहेत, त्यांना हे औषध दिले जाणार नाही.