CoronaVirus News : ९१% रुण झाले बरे; मृत्यूदर केवळ १.४९%; ५,८२,६४९ रुग्णांवर उपचार सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2020 01:28 AM2020-11-01T01:28:10+5:302020-11-01T06:14:41+5:30
CoronaVirus News : केंद्रीय आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार, कोरोना रुग्णांची एकूण संख्या ८१,३७,११९ तर बरे झालेल्यांचा आकडा ७४,३२,२८९ झाला आहे.
नवी दिल्ली : देशात कोरोनाचे ४८,६४८ नवे रुग्ण आढळून आले असून, एकूण रुग्णसंख्या ८१ लाख ३७ हजारांपेक्षा अधिक झाली आहे. बरे झालेल्या रुग्णांचा आकडा ७४ लाखांपेक्षा जास्त असून त्यांचे प्रमाण ९१.३४ टक्के आहे. या संसर्गामुळे आणखी ५५१ जण मरण पावले असून, बळींचा एकूण आकडा १,२१,६४१ झाला आहे.
केंद्रीय आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार, कोरोना रुग्णांची एकूण संख्या ८१,३७,११९ तर बरे झालेल्यांचा आकडा ७४,३२,२८९ झाला आहे. कोरोना रुग्णांचा मृत्यूदर १.४९ टक्क्यांपर्यंत खाली घसरला आहे. देशात ५,८२,६४९ कोरोना रुग्ण उपचार घेत असून, त्यांचे प्रमाण एकूण रुग्णसंख्येच्या ७.१६ टक्के आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) या संस्थेने सांगितले की, देशात शुक्रवारपर्यंत १०,८७,९६,०६४ इतक्या कोरोना चाचण्या पार पडल्या.
भाजपकडून निवडणूक आचारसंहितेचा भंग नाही
बिहारमधील जनतेला कोरोना प्रतिबंधक लस मोफत देण्याच्या भाजपच्या आश्वासनामुळे निवडणूक आचारसंहितेचा भंग झालेला नाही, असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. भाजपने आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात तसे आश्वासन दिले होते. याप्रकरणी माहिती अधिकार कार्यकर्ते साकेत गोखले यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती.
‘या’ कारणांमुळे वाढला दिल्लीतील कोरोना!
- सणासुदीच्या काळ, हिवाळ्याचे आगमन आणि वायू प्रदूषण याचा एकत्रित परिणाम होऊन दिल्लीतील कोविड-१९ रुग्णांची संख्या वाढली आहे, असे प्रतिपादन दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी केले आहे.
-या आठवड्यात दररोजच्या कोविड-१९ रुग्णसंख्येत चौपट वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर जैन यांनी हे स्पष्टीकरण दिले आहे. रुग्ण वाढल्यामुळे केंद्रीय गृहमंत्रालयाने सोमवारी दिल्ली सरकारच्या अधिकाऱ्यांची एक बैठक बोलावली आहे. जैन यांनी सांगितले की, लोक मास्क वापरण्यास महत्त्व देत नसल्यामुळेही कोरोना वाढत आहे.
मास्क वापरल्याने प्रदूषणापासूनही आपले संरक्षण होऊ शकते.