CoronaVirus News : विमान सेवा सुरू होणार? एजन्सींच्या पथकाची दिल्ली विमानतळाला भेट!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2020 02:34 PM2020-05-11T14:34:28+5:302020-05-11T14:46:21+5:30
CoronaVirus News : डीजीसीए, ब्युरो ऑफ नागरी उड्डयन सुरक्षा कार्यालय, भारतीय विमानतळ प्राधिकरण, दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेड आणि सीआयएसएफ यांच्या संयुक्त पथकाने सोमवारी दिल्ली विमानतळाला भेट दिली.
नवी दिल्ली : देशात उद्यापासून काही पॅसेंजर ट्रेन सुरू होणार आहे. यानंतर आता प्रवाशांसाठी विमान सेवा सुद्धा सुरू करण्यासाठी तयारी करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर डीजीसीए, ब्युरो ऑफ नागरी उड्डयन सुरक्षा कार्यालय, भारतीय विमानतळ प्राधिकरण, दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेड आणि सीआयएसएफ यांच्या संयुक्त पथकाने सोमवारी दिल्ली विमानतळाला भेट दिली.
नागरी उड्डयन मंत्रालयाच्या (डीजीसीए, ब्युरो ऑफ नागरी उड्डयन सुरक्षा कार्यालय, भारतीय विमानतळ प्राधिकरण, दिल्ली इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड, सीआयएसएफ) संयुक्त पथकाने विमान उड्डाणे पुन्हा सुरू होण्यापूर्वी दिल्ली विमानतळावर भेट दिली आणि तयारीची सविस्तर माहिती दिली.
DAILच्या अहवालानुसार, दिल्ली विमानतळावर आर्ट सुविधा सुरू केली जाणार आहे, ज्यामुळे सर्व ट्रॉली व ट्रे विषाणूमुक्त होईल. प्रवाशांच्या बॅग्ज व्हायरसमुक्त करण्यासाठी दिल्ली विमानतळाच्या टर्मिनल 3 वर DIALने एक यूव्ही टनेल देखील तयार केला आहे. यूव्ही स्कॅनिंग प्रक्रिया आणि बॅगच्या रिक्मेलचे थेट सीसीटीव्ही फीड उपलब्ध होतील.
याशिवाय, दिल्ली विमानतळावर मोबाइल निर्जंतुक टॉवर्सही तयार करण्यात आले आहेत. तसेच, 336 स्वयंचलित हँड सॅनिटायझर डिस्पेंसर मशीन्स बसवण्याची प्रक्रियाही टप्प्या-टप्प्याने सुरू झाली आहे. विमानतळावरील प्रवाशांचे वॉशरूम, टर्मिनल इमारत आणि टच पॉईंट्स नियमितपणे स्वच्छ करण्याचे कामही सुरू झाले आहे.
दरम्यान, देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी १७ मेपर्यंत लॉकडाऊन सुरु आहे. त्यामुळे प्रवाशांसाठी देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमान सेवा बंद करण्यात आली आहे.