CoronaVirus News: 'त्या' ५६५ जणांनी झोप उडवली; कोरोना रुग्णांचा आकडा वेगानं वाढणार?
By कुणाल गवाणकर | Published: December 30, 2020 10:41 AM2020-12-30T10:41:41+5:302020-12-30T10:42:46+5:30
CoronaVirus News: ब्रिटनहून आलेल्या नव्या स्ट्रेनमुळे धाकधूक वाढली
लखनऊ: देशातील कोरोना रुग्णांची संख्या १ कोटींच्या पुढे गेली आहे. सध्याच्या घडीला देशात दररोज कोरोनाचे सरासरी २० हजार रुग्ण आढळून येत आहेत. एका बाजूला कोरोना विषाणूच्या संक्रमणाचा वेग मंदावला असताना दुसरीकडे ब्रिटनहून आलेल्या नागरिकांनी चिंता वाढवली आहे. ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा स्ट्रेन आढळून आला. त्यामुळे गेल्या महिन्याभरात ब्रिटनहून आलेल्या लोकांचा शोध सुरू आहे.
ब्रिटनहून आलेल्या अवघ्या दोन वर्षांच्या चिमुरडीमध्ये कोरोनाचा नवा स्ट्रेन आढळून आल्याचं काळजी वाढली आहे. त्यानंतर आरोग्य यंत्रणा अलर्टवर आहे. ब्रिटनहून आलेले प्रवासी पॉझिटिव्ह आढळून आल्यास संबंधित भागांत कन्टेनमेंट झोनमध्ये लागू असलेल्या नियमांची अंमलबजावणी केली जात आहे. ब्रिटनमहून आलेल्या ५६५ जणांशी आरोग्य विभागाचा कोणताही संपर्क होत नसल्यानं चिंतेत भर पडली आहे. आरोग्य विभागानं अनेकदा पुढे येण्याचं आवाहन करूनही त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही.
ब्रिटनहून एकूण १ हजार ६५५ जण उत्तर प्रदेशात आले. त्यांची यादी केंद्र सरकारनं उत्तर प्रदेश सरकारला दिली. यातील १ हजार ९० प्रवाशांशी संपर्क साधण्यात यश आलं आहे. मात्र उर्वरित प्रवाशांशी संपर्क होऊ शकलेला नाही. यातील बहुतांश जणांचे मोबाईल स्विच ऑफ आहेत. ब्रिटनहून राज्यात परतलेल्या एका दोन वर्षांच्या मुलीला नव्या स्ट्रेनची लागण झाल्यानं आरोग्य यंत्रणेची झोप उडाली आहे. काल दुपारपर्यंत आरोग्य विभागाकडे या मुलीची माहिती उपलब्ध नव्हती.
आयसीएमआरकडून एक ते दोन दिवसांत जीनोम सिक्वेंसिंगचा अहवाल दिला जाईल असा दावा करण्यात आला होता. मात्र काल संध्याकाळी उशिरा एका चिमुरडीला कोरोनाच्या नव्या स्ट्रेनची लागण झाल्याचं समजताच संपूर्ण रणनीती बदलावी लागली आहे. ब्रिटनहून परतलेले प्रवासी वास्तव्यात असलेल्या भागांमध्ये आयसोलेशन आणि कन्टेनमेंटच्या नियमांचं सक्तीनं पालन केलं जात आहे. त्यासाठी स्थानिक पोलिसांची मदत घेतली जात आहे. ब्रिटनहून आलेल्या प्रवाशांच्या घराबाहेर पोस्टर चिकटवण्याचे आदेशही आरोग्य विभागाकडून देण्यात आले आहेत.