CoronaVirus News: स्पुटनिक लसीचं उत्पादन करण्याची परवानगी द्या; सीरमचा DCGIकडे अर्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2021 12:45 PM2021-06-03T12:45:18+5:302021-06-03T12:52:34+5:30
CoronaVirus News: कोविशील्डची निर्मिती करणारी सीरम आता स्पुटनिक व्ही लसीचं उत्पादन करण्याच्या तयारीत
नवी दिल्ली: देशातील कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. ही लाट थोपवण्यासाठी कोरोनी लसीकरणाचा वेग वाढवण्याची गरज आहे. देशाच्या अनेक राज्यांमध्ये लसींची टंचाई जाणवत असताना आता सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियानं स्पुटनिक व्ही लसीच्या उत्पादनासाठी परवानगी मागितली आहे. स्पुटनिक व्ही लसीच्या निर्मितीसाठी सीरमनं औषध महानियंत्रकांकडे (डीसीजीआय) अर्ज केला आहे. एएनआय या वृत्तसंस्थेनं सुत्रांच्या हवाल्यानं याबद्दलचं वृत्त दिलं आहे.
पुण्यात मुख्यालय असलेली सीरम सध्याच्या घडीला कोविशील्ड लसींचं उत्पादन करत आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि ऍस्ट्राझेनेकानं यासाठीचं संशोधन केलं असून निर्मितीची जबाबदारी सीरमकडे आहे. कोविशील्ड लसीच्या उत्पादनाला वेग देत असताना सीरमनं आता स्पुटनिकच्या निर्मितीसाठीदेखील अर्ज केला आहे. सध्या स्पुटनिक व्ही लसीचं उत्पादन डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजकडून करण्यात येत आहे. डीसीजीआयनं सीरमला स्पुटनिक व्ही लसीची निर्मिती करण्याची परवानगी दिल्यास लसींचं उत्पादन अतिशय गतीमान होईल. जगातील सर्वात मोठी औषध उत्पादक कंपनी असा सीरमचा लौकिक आहे.
Serum Institute of India (SII) applies to the Drug Controller General of India (DCGI) seeking permission for a test license to manufacture COVID19 vaccine, Sputnik V: Sources pic.twitter.com/U10LWA5Imr
— ANI (@ANI) June 3, 2021
सीरम जून महिन्यात कोविशील्डच्या १० कोटी डोसचं उत्पादन करणार आहे. तशी माहिती सीरमनं आधीच सरकारला दिली आहे. सीरम सध्याच्या घडीला नोवावॅक्सचीदेखील निर्मिती करत आहे. नोवावॅक्सला लवकरच अमेरिकेकडून मंजुरी मिळू शकते. रशियन लस असलेल्या स्पुटनिक व्ही लसीच्या आपत्कालीन वापरास डीसीजीआयनं एप्रिलमध्ये परवानगी दिली. स्पुटनिक व्ही लसीचे ३० लाख डोस काही दिवसांपूर्वीच रशियाहून हैदराबादला आले. देशात आयात झालेला हा आतापर्यंतचा सर्वात मोठा लसींचा साठा आहे.