CoronaVirus News : लोकसंख्या अधिक तरी भारतात रुग्ण कमी, बरे होण्याचा दरही अमेरिकेपेक्षा जास्त
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2020 03:30 AM2020-06-23T03:30:40+5:302020-06-23T07:06:08+5:30
CoronaVirus News : इतर देशांच्या तुलनेत भारतात कोरोनाचा वेग कमी आहे. आता कोरोनातून बरे होणाऱ्यांची संख्याही वेगाने वाढत आहे.
एस. के. गुप्ता
नवी दिल्ली : भारतातील लोकसंख्येच्या घनत्वाचा विचार केला तर देशात दर एक लाख लोकसंख्येमागे सगळ््यात कमी कोरोना विषाणूची बाधा झालेले रुग्ण आहेत. भारतात एक लाख लोकसंख्येमागे ३०.०४ रुग्ण आहेत तर जागतिक सरासरी त्याच्या तीनपट (११४.६७) आहे. इतर देशांच्या तुलनेत भारतात कोरोनाचा वेग कमी आहे. आता कोरोनातून बरे होणाऱ्यांची संख्याही वेगाने वाढत आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचए) अहवालाचा आधार घेऊन म्हटले की, देशात कोरोनाचे ४.२५ लाख रुग्ण असून त्यातील २.३७ लाखांपेक्षा जास्त बरे होऊन घरी गेले आहेत. याशिवाय लोकसंख्या घनत्व जास्त असूनही कोविड-१९ वर नियंत्रणासाठीराज्य चांगले काम करत आहेत. महाराष्ट्र आणि दिल्लीत कोविड-१९ रुग्ण बरे होण्याचा दर वाढल्यामुळे ही सुधारणा दिसत आहे.
देशात कोविड-१९ चे रुग्ण बरे होण्याची संख्या सतत वाढत आहे. आतापर्यंत एकूण दोन लाख ३७ हजार १९५ रुग्ण बरे झाले आहेत. गेल्या २४ तासांत एकूण नऊ हजार ४४० रुग्ण बरे झाले. याचा परिणाम म्हणून रुग्ण बरे होण्याचा दर वाढून ५५.७७ टक्के झाला आहे. दिल्लीत गेल्या चार दिवसांत बरे होण्याचा दर १८ टक्के होता. दिल्लीत चार महिन्यांत कोरोनाचे रुग्ण जेवढे बरे झाले नाहीत त्यापेक्षा जास्त या चार दिवसांत बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे दिल्लीचा रुग्ण बरे होण्याचा दर ५५.२५ टक्के झाला आहे. महाराष्ट्रात १३२०७५ कोरोनाचे रुग्ण आहे. बरे झालेल्या रुग्णांची संख्या ६५७४४ आहे. गेल्या एका आठवड्यात दिल्ली अचानक तमिळनाडूला मागे टाकून दुसºया क्रमांकावर आली. तमिळनाडूतही कोरोनाचे रुग्ण ५९३७७ असून बरे झालेल्यांची संख्या ३२७५४ आहे.
>जर्मनीत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सर्वाधिक
कोरोनाचा फटका बसलेल्या देशांमध्ये रुग्ण बरे होण्याच्या दरात भारत अमेरिकेपेक्षा पुढे आहे. सगळ््यात चांगला दर जर्मनीचा ९२ टक्क्यांपेक्षा जास्त आहे. त्यानंतर इराण ८०, इटली ७५ टक्के व नंतर रशियाचा क्रमांक आहे. रशियाचा रुग्ण बरे होण्याचा दर भारताच्या जवळपासचा आहे. कोरोनाचा सगळ््यात मोठा फटका बसलेल्या अमेरिकेत रुग्ण बरे होण्याचा दर ४० टक्क्यांच्या जवळपास आहे.