CoronaVirus News : अमित शहा 'अॅक्शन मोड'मध्ये, आज बोलविली सर्वपक्षीय बैठक
By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2020 10:42 AM2020-06-15T10:42:37+5:302020-06-15T10:44:24+5:30
CoronaVirus News : दिल्लीत कोरोना रूग्णांची संख्या 41 हजारांच्या पुढे गेली असून 1300 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.
नवी दिल्ली : देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 332424 वर पोहोचला आहे. तर दिल्लीत कोरोना रूग्णांची संख्या 41 हजारांच्या पुढे गेली असून 1300 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. दिल्लीत कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे केंद्र आणि राज्य सरकारवरील ताण वाढला आहे. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात आहे. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभमूमीवर मंत्र्यांच्या अनेक स्तरावर बैठका सुरू आहे.
दिल्लीत कोरोनाचा सामना करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज पुन्हा एकदा सर्वपक्षीय बैठक बोलविली आहे. ही बैठक सकाळी 11 वाजल्यापासून सुरू होईल. यात भाजपा, आम आदमी पार्टी, काँग्रेस आणि दिल्लीचे बसपाचे अध्यक्ष यांचा समावेश असणार आहे. दरम्यान, अमित शहा यांनी काल अरविंद केजरीवाल यांच्यासमवेत दिल्लीतील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बैठक घेतली. यानंतर अमित शहा यांनी सायंकाळी पाच वाजता महापौर आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांसमवेत झालेल्या बैठकीत कोरोनाबद्दल चर्चा केली. या बैठकीला लेफ्टनंट गव्हर्नर अनिल बैजल, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन हेदेखील उपस्थित होते. बैठकीत दिल्लीतील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कृती आराखडा तयार करण्यात आला आहे.
रुग्णालयांतील बेड्सची कमतरता लक्षात घेता, दिल्लीला रेल्वेगाड्यांचे 500 आयसोलेशन डबे देण्याची तयारी सुरु आहे. यामुळे 8000 बेड्स उपलब्ध होतील. तसेच, दिल्लीत कोरोना चाचणी 2 दिवसांत दुप्पट होईल आणि 6 दिवसांत तिप्पट होईल. दिल्लीच्या कंटेनमेंट झोनमध्ये कॉन्टॅक्ट मॅपिंग चांगल्या प्रकारे करण्यास सक्षम होण्यासाठी, प्रत्येक व्यक्तीचे घर-घर व्यापक आरोग्य सर्वेक्षण केले जाणार आहे. एका आठवड्यात संपर्क मॅपिंगचा अहवाल दिला जाईल. तसेच, चांगली देखरेख ठेवण्यासाठी आरोग्य सेतु अॅप येथील प्रत्येक व्यक्तीच्या मोबाइलमध्ये डाऊनलोड करण्यास सांगितले जाईल. याशिवाय, कोरोना मृताचा मृतदेह तातडीने कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात येणार आहे.
दिल्लीतील लहान रुग्णालयांना कोरोनाबद्दल योग्य माहिती व मार्गदर्शक सूचना देण्यासाठी मोदी सरकारने एम्समध्ये दूरध्वनी मार्गदर्शनासाठी ज्येष्ठ डॉक्टरांची समिती गठित करण्याचा निर्णय घेतला असून त्यांचा हेल्पलाइन क्रमांक आज जाहीर केला जाणार आहे. मात्र, पुन्हा लॉकडाऊनची शक्यता पूर्णपणे फेटाळून लावण्यात आली आहे. दरम्यान, दिल्लीत कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. गेल्या 24 तासांत दिल्लीमध्ये 2224 नवीन रुग्ण आढळले आहेत आणि 56 लोकांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत दिल्ली कोरोनाची रुग्णांची संख्या 41182 वर पोहचली आहेत, तर आतापर्यंत 1327 लोकांचा मृत्यू झाला आहे. अशा परिस्थितीत दिल्लीतील परिस्थितीवर नियंत्रण ठेवणे सरकारसाठी आव्हान आहे.