CoronaVirus News : चिंता वाढली! महाकुंभात कोरोनाचे थैमान; १०२ संत, भाविकांना संसर्ग
By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2021 01:03 AM2021-04-14T01:03:22+5:302021-04-14T07:21:29+5:30
CoronaVirus News : महाकुंभामध्ये साेमवती अमावस्येच्या पर्वावर शाही स्नान पार पडले. त्यावेळी लाखाे भाविकांनी गर्दी केली हाेती. काेराेना नियमावलीची सर्वत्र पायमल्ली हाेताना दिसून आली.
हरिद्वार : देशात काेराेनाचे दरराेज दीड लाखांहून अधिक रुग्ण आढळत असतानाच महाकुंभात दुसऱ्या शाही स्नानानंतर १०२ साधू, महंत व भाविक कोराेना पाॅझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे महाकुंभ प्रशासनाची चिंता वाढली आहे. लाखाे भाविकांच्या उपस्थितीत काेराेना नियमांची अंमलबजावणी करताना प्रशासन पूर्णपणे हतबल झाल्याचे दिसत आहे.
महाकुंभामध्ये साेमवती अमावस्येच्या पर्वावर शाही स्नान पार पडले. त्यावेळी लाखाे भाविकांनी गर्दी केली हाेती. काेराेना नियमावलीची सर्वत्र पायमल्ली हाेताना दिसून आली. अनेक साधू, भाविकांनी साेशल डिस्टंसिंग आणि मास्कच्या नियमांचे पालन न करता स्नान केले. त्याची परिणती म्हणजे १०२ साधू आणि भाविकांचे काेराेना रिपाेर्ट पाॅझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. पाेलीस यंत्रणेने सक्तीने नियमांची अंमलबजावणी करण्यात असमर्थता व्यक्त करतानाच चेंगराचेंगरी हाेण्याची भीती व्यक्त केली हाेती.
रविवारपासून साेमवारी सायंकाळपर्यंत प्रशासनाने १८ हजार भाविकांच्या चाचण्या केल्या. प्रशासनाने दरराेज ५० हजार चाचण्या करण्याचा दावा केला हाेता. मात्र, ताे फाेल ठरला. रेल्वेस्थानकापासून हर की पाैडी तसेच इतर घाटांवर कुठेही थर्मल स्क्रीनिंग केले जात नव्हते. थर्मल स्कॅनरची सुविधा असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचीही नजर परिसरात आहे. मात्र, मास्क न घालणाऱ्यांवर कारवाई हाेत नव्हती. (वृत्तसंस्था)
विनाचाचणी भाविक दाखल
महाकुंभासाठी येणाऱ्या भाविकांना आरटी-पीसीआर चाचणी बंधनकारक आहे. मात्र, अनेक भाविक विनाचाचणी दाखल हाेत असल्याचेही आढळून आले आहे. चाचणी अहवाल तपासण्यासाठीही यंत्रणा नाही. कुठल्याही एका ठिकाणी माेठी गर्दी हाेऊ नये, यासाठी चालान आणि थर्मल स्क्रीनिंग सध्या टाळले आहे. गर्दी नियंत्रणावर सध्या लक्ष केंद्रित केल्याचे पाेलीस महानिरीक्षक संजय गुंज्याल यांनी सांगितले.