CoronaVirus News: कोरोना योद्ध्यांना अनोखी मानवंदना; सैन्याकडून फ्लाय पास्टला सुरुवात
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2020 09:35 IST2020-05-03T08:24:02+5:302020-05-03T09:35:18+5:30
CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाबाधितांवर उपचार करणाऱ्या रुग्णालयांवर पुष्पवर्षाव

CoronaVirus News: कोरोना योद्ध्यांना अनोखी मानवंदना; सैन्याकडून फ्लाय पास्टला सुरुवात
मुंबई: कोरोना संकटाचा अतिशय हिमतीनं सामना करणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांना आज सैन्याच्या तिन्ही दलांकडून अनोखी मानवंदना दिली जाणार आहे. कोरोनाशी दोन हात करणाऱ्या डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी आणि इतरांचे आभार मानण्यासाठी तिन्ही दलांच्या जवानांकडून रुग्णालयांवर पुष्पवृष्टी करण्यात येईल. संपूर्ण देशात आज हे अनोखं दृश्य पाहायला मिळेल. जम्मू-काश्मीरमधून हवाई दलानं फ्लाय पास्टला सुरुवात केली आहे.
#WATCH Two IAF C-130J Super Hercules special operations transport aircraft fly over Sukhna Lake in Chandigarh. The aircraft took off from Srinagar,J&K and will fly all the way to Trivandrum in Kerala to show gratitude towards COVID-19 warriors. pic.twitter.com/iFGSrbFGq0
— ANI (@ANI) May 3, 2020
आजच्या मानवंदनेसाठी तिव्ही दलाच्या जवानांनी मोठी तयारी केली आहे. शनिवारी मुंबईच्या किनाऱ्यांवर नौदलाच्या अधिकारी आणि जवानांनी याचा सराव केला. या दरम्यान नौदलाच्या जहाजांचा वापर करण्यात आला. कोरोना योद्धांना सलाम करण्यासाठी देशभरातल्या रुग्णालयांवर पुष्पवृष्टी करून तिन्ही दलांकडून पुष्पवर्षाव करण्यात येईल, अशी माहिती चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत यांनी दिली. दिल्लीतल्या पोलीस मेमोरियलमध्ये श्रद्धांजली अर्पण करून याची सुरुवात होईल. यानंतर हवाई दल देशभरात फ्लाय पास्ट करेल.
हवाई दलाचा पहिला फ्लाय पास्ट श्रीनगर ते त्रिवेंद्रम असा असेल. तर दुसरा फ्लाय पास्ट डिब्रुगढ ते कच्छ असा असेल. हवाई दलाची वाहतूक आणि लढाऊ विमानं यामध्ये सहभागी होतील. नौदलाची हेलिकॉप्टर्स कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या रुग्णालयांवर आकाशातून पुष्पवृष्टी करतील. भारतीय लष्कर देशभरातल्या जवळपास सर्वच जिल्ह्यांमधल्या कोविड रुग्णालय परिसरात माऊंटन बँडचं सादरीकरण करेल. तर नौदलाच्या जहाजांवर दुपारी ३ नंतर रोषणाई दिसेल.
कोणकोणत्या शहरांमध्ये फ्लाय पास्ट?
दिल्ली, मुंबई, जयपूर, अहमदाबाद, गुवाहाटी, पाटणा आणि लखनऊमध्ये लढाऊ विमानं फ्लाय पास्ट करतील. तर श्रीनगर, चंडीगढ, दिल्ली, जयपूर, भोपाळ, मुंबई, हैदराबाद, बंगळुरू, कोईम्बतूर आणि तिरुअनंतपुरममध्ये हवाई दलाची वाहतूक विमानं फ्लाय पास्ट करणार आहेत.
लष्कराच्या बँडचं सादरीकरण
सकाळी १० वाजता एम्स, केंट बोर्ड रुग्णालय आणि नरेला रुग्णालयाच्या बाहेर लष्कराचा बँड सादरीकरण करेल. सकाळी साडे दहा वाजता बेस रुग्णालय परिसरात लष्कराच्या बँडचं संगीत ऐकता येईल. तर ११ वाजता गंगाराम रुग्णालय आणि आर अँड आर रुग्णालयाबाहेर माऊंटन बँडचं सादरीकरण असेल.
रुग्णालयांवर पुष्पवृष्टी
चेन्नईत सकाळी साडे दहा ते पावणे अकराच्या दरम्यान अन्ना सलई आणि राजीव गांधी जनरल रुग्णालयावर पुष्पवर्षाव केला जाईल. मुंबईत सकाळी १० ते पावणे अकरा दरम्यान के. ई. एम, कस्तुरबा गांधी आणि जे. जे. रुग्णालयांवर पुष्पवृष्टी होईल. जयपूरमध्ये सकाळी साडे दहा वाजता एस. एम. एस. रुग्णालयावर पुष्पवर्षाव करण्यात येईल. तर लखनऊमध्ये सकाळी १० वाजता किंग जॉर्ज वैद्यकीय महाविद्यालय आणि साडे दहा वाजता पी. जी. आयवर पुष्पवृष्टी केली जाईल.
मुंबईची आरोग्य यंत्रणा राज्य शासनाने ताब्यात घ्यावी; भाजपा आमदाराचं मुख्यमंत्र्यांना पत्र
लॉकडाऊनच्या वाढीव कालावधीसाठी राज्य शासनामार्फत मार्गदर्शक सूचना जारी
महाराष्ट्राची मागणी धुडकावून वित्तीय सेंटर गुजरातमध्ये; सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली