CoronaVirus News: कोरोना लसीच्या मानवी चाचण्यांसाठी लागणार १० हजार स्वयंसेवकांची फौज
By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2020 12:41 AM2020-07-24T00:41:09+5:302020-07-24T06:24:56+5:30
एम्सने लसीच्या मानवावरील चाचणीसाठी केलेल्या आवाहनाला दिल्लीत लोकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला.
- हरिश गुप्ता
नवी दिल्ली : जगभर कोरोनाविरोधी खंबीरपणे लढा देण्यासोबत या रोगावर प्रभावी लस विकसित करण्याचे काम प्रगतिपथावर आहे. भारतासह जगभरातील वैद्यकीय आणि औषधी क्षेत्रातील कंपन्यांसह मान्यवर संशोधक व तज्ज्ञांचे कसोशीने प्रयत्न चालू आहेत.
भारतीय औषधी महानियंत्रक (डीसीजीआय)आणि केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार कोरोना साथरोगाचा मुकाबला करण्यासाठी कोरोना योद्ध्यांची जशी फौज उभी राहिली, त्याचप्रमाणे आता भारताला कोरोनावरील लसीची मानवावर चाचणी करण्यासाठी १० हजार स्वयंसेवयंकाची फौज लागणार आहे. मानवी इतिहासात या लशीची मागणी वाढणार असल्याने बऱ्याच कंपन्यांनी मानवावर लसीची चाचणी सुरू केल्यास त्यासाठी अधिक स्वयंसेवक लागतील.
एम्सने लसीच्या मानवावरील चाचणीसाठी केलेल्या आवाहनाला दिल्लीत लोकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला. लस टोचून घेण्यासाठी ३७५ व्यक्तींची गरज असताना दोन हजारांहून अधिक लोकांनी स्वयंस्फूर्तीने अर्ज करून चाचणीसाठी तयारी दाखविली. पुढच्या एक वर्षात सात औषधी कंपन्यांकडून या स्वयंसेवकांवर महत्त्वाच्या चाचण्या केल्या जातील. दिल्लीतील एम्समध्ये गुरुवारपासून चाचणी सुरू करण्यात आली असून, गोव्यात राज्य सरकारच्या रेडकर इस्पितळात बुधवारपासून मानवावरील चाचण्यांना सुरुवात करण्यात आली.
देशभरात १२ ठिकाणी या चाचण्या करण्यात येणार आहेत. भारत बायोटेक आणि आयसीएमआरने संयुक्तपणे विकसित केलेल्या लसीची (कोव्हॅक्सिन) पहिली मात्रा ६०० स्वयंसेवकांना दिली जाणार आहे. त्यानंतर अधिक मात्रा देऊन चाचण्यांच्या दुसºया टप्प्यासाठी ३७५ स्वयंसेवकांची गरज लागेल.
मानवी आरोग्य आणि जीवनाच्या दृष्टीने चिकित्सालयीन चाचणी जोखमीची असल्याने लसीची चाचणी करून घेणाऱ्यांना योद्धे म्हटले जाते. लसीच्या चाचण्यांच्या प्रगतीवर पंतप्रधान स्वत: लक्ष ठेवून आहेत, तसेच प्रधान वैज्ञानिक सल्लागार आणि लसीवरील कार्यदलाच्या सह-चेअरमनशी संपर्क साधून आहेत.
भारत बायोटेक आणि झायडस कॅडिला हेल्थकेअर लिमिटेड या कंपन्यांना डीसीजीआयने चाचण्या करण्यास परवानगी दिली आहे. याशिवाय पॅनासिया बायोटेक, मिनव्हॅक्स आणि बायोलॉजिकल-ई या कंपन्याही लस विकसित करीत आहेत. आॅक्सफर्डने विकसित केलेली लस मानवी चाचणीच्या तिसºया टप्प्यात असून, सेरम संस्था ही आॅक्सफर्डच्या लसीचे उत्पादन करण्याच्या तयारीत आहे. भारत बायोटेकने भारतातील १२ ठिकाणी १,२०० लोकांवर चाचणी सुरू केली आहे. लसीची मानवावर चाचणी करण्यासाठी एका कंपनीला पुढील सहा महिन्यांदरम्यान १८०० ते २००० लस योद्ध्यांची गरज लागेल.