CoronaVirus News: देशातील पहिलं कोरोनामुक्त राज्य; 'या' राज्यात कोरोनाचा एकही रुग्ण नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2022 10:53 AM2022-03-28T10:53:34+5:302022-03-28T10:55:02+5:30
गेल्या २४ तासांत एकही रुग्ण नाही, एकही ऍक्टिव्ह रुग्ण नाही
इटानगर: देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक घट होत आहे. या दरम्यान एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. अरुणाचल प्रदेश देशातलं पहिलं कोरोनामुक्त राज्य ठरलं आहे. लोहित जिल्ह्यात एका कोरोना रुग्णावर गेल्या काही दिवसांपासून उपचार सुरू होते. या रुग्णानं कोरोनावर मात केली. त्यामुळे आता राज्यात कोरोनाचा एकही रुग्ण नाही.
गेल्या २४ तासांत राज्यात एकाही कोरोना रुग्णाची नोंद झाली नसल्याचं राज्याचे आरोग्य अधिकारी लोबसांग जम्पा यांनी सांगितलं. राज्यात आतापर्यंत १२.६८ लाख कोविड चाचण्या झाल्या आहेत. १६ लाख ५८ हजार ५३६ जणांना कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्यात आली आहे.
देशातील कोरोना संक्रमणाचा वेग कमी झाला आहे. गेल्या २४ तासांत कोरोनाचे १ हजार २७० नवे रुग्ण आढळून आले आहेत. आतापर्यंत देशात ४ कोटी ३० लाख २० हजार ७२३ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. सध्या १५ हजार ८५९ जणांवर उपचार सुरू आहेत. गेल्या २४ तासांत ३१ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात आतापर्यंत ५ लाख २१ हजार ३५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.