CoronaVirus News : रॅपिड अॅन्टीबॉडी टेस्ट कीटस्वरील बंदीचे गूढ कायम; स्वीत्झर्लंड, दक्षिण कोरियातूनही मागवले होते कीटस्
By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2020 01:24 AM2020-05-18T01:24:17+5:302020-05-18T01:24:39+5:30
CoronaVirus News in Marathi and Live Updates : चीनच्या दोन कंपन्यांकडून आयात करण्यात आलेल्या रॅपिड अॅन्टीबॉडी टेस्ट कीटस्च्या वापर करण्यावर आयसीएमआरने मागच्या महिन्यात बंदी घातली होती. तथापि, या बंदीभोवती गूढ वाढत आहे.
नवी दिल्ली : कोरोना विषाणूंचा संसर्ग झाला की नाही? याची जलदगतीने चाचणी करून निदान करण्यास सक्षम असलेल्या रॅपिड अॅन्टीबॉडी टेस्टचा (जलद प्रतिद्रव्य चाचणी) अवलंब करण्यास भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेकडून (आयसीएमआर) होत असलेल्या दिरंगाईबाबत आरोग्यतज्ज्ञ आश्चर्यचकित आहेत. चीनच्या दोन कंपन्यांकडून आयात करण्यात आलेल्या रॅपिड अॅन्टीबॉडी टेस्ट कीटस्च्या वापर करण्यावर आयसीएमआरने मागच्या महिन्यात बंदी घातली होती. तथापि, या बंदीभोवती गूढ वाढत आहे.
आयसीएमआरच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, चीनच्या रॅपिड अॅन्टीबॉडी टेस्ट कीटस्च्या निष्कर्षाचे विश्लेषणासह मूल्यांकन केले जात आहे. राजस्थान आणि अन्य काही राज्यांत करण्यात आलेल्या चाचण्यांच्या निष्कर्षाचा फेरआढावा घेतला जात आहे.
चीनमधून आयात करण्यात आलेले रॅपिड अॅन्टीबॉडी टेस्ट कीटस् सदोष आढळल्याने अन्य देशांंतून मागविण्यात आलेल्या टेस्ट कीटस्चा वापर का केला जात नाही? असे विचारले असता या अधिकाºयाने सांगितले की, रॅपिड अॅन्टीबॉडी टेस्ट कीटस्च्या सर्व पैलंूनी आम्ही विश्लेषण करीत आहोत. तथापि, त्यांनी अधिक तपशील सांगण्याचे टाळले.
अडीचशे ते साडेचारशे रुपये किमतीच्या टेस्ट कीटस्च्या माध्यमातून २५० लोकांची चाचणी करून तीस मिनिटांत निष्कर्ष देणाºया रॅपिड अॅन्टीबॉडी टेस्ट कीटस्चा मात्र जगभरात सर्वत्र वापर केला जात आहे. भारतात मात्र बंदी घालण्यात आल्याबद्दल आरोग्यतज्ज्ञ आश्चर्य व्यक्त करतात.
आरोग्यतज्ज्ञांच्या मते बंदीच्या निर्णयाने एका अर्थाने जलद चाचणी आणि कोरोनाविरोधी लढ्याच्या क्षमतेशी तडजोडच करण्यात आली. पन्नास दिवस उलटूनही आयसीएमआर मात्र रॅपिड अॅन्टीबॉडी टेस्ट कीटस्च्या मुद्यावर काहीही बोलत
नाही.
सूत्रांनुसार चीनला दुखविण्याची सरकारची इच्छा नाही. भारतातील चीनच्या दूतावासानेही सदोष चाचणी निष्कर्षासाठी कीटस्ला दोषी ठरविण्यात आल्याचा तीव्र निषेध नोंदविला होता. रॅपिड अॅन्टीबॉडी टेस्ट कीटस्चा मुद्दा गुंडाळल्याने या कीटस्च्या वापरावरील बंदीभोवतीचे गूढ मात्र आणखीच वाढत आहे.
प्रकरण काय?
1 हे टेस्ट कीटस् खरेदी करण्यासाठी आयसीएमआरने २४ मार्च रोजी जागतिक पातळीवर निविदा मागावल्या होत्या. दोन चिनी वितरक कंपन्यांच्या माध्यमातून ५ लाख कीटस् खरेदी करण्यात आले होते.
2 राज्यांनाही हे विहित कीटस् खरेदी करण्याची परवानगी देण्यात आली होती. अनेक राज्यांनी चीन, दक्षिण कोरिया आणि स्वीत्झर्लंडकडून कीटस् खरेदी केली होते; परंतु राजस्थान आणि अन्य ठिकाणी ६ एप्रिल रोजी अचानक चिनी कीटस् सदोष आढळल्याने चाचणीसाठी कीटस्चा वापर थांबविण्यात आला होता.
3 फक्त चीनच नव्हे, तर अन्य देशांतून मागविण्यात आलेल्या कीटस्च्या वापरावर आयसीएमआरने बंदी घातली.