CoronaVirus News: धक्कादायक! रुग्णवाहिका आली, कर्मचारी उतरले अन् कोरोना बाधितांचे मृतदेह नदीत फेकले
By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2021 07:13 PM2021-05-12T19:13:30+5:302021-05-12T19:18:01+5:30
CoronaVirus News: संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद; सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल; परिसरात खळबळ
कटिहार: देशात आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं सर्वांची चिंता वाढवली आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे. अनेक राज्यांमधील आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटरवर आहे. उत्तर प्रदेश आणि बिहारमधील स्थितीदेखील दिवसागणिक बिघडत चालली आहे. अनेक कोरोना रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नाहीत. याशिवाय कित्येक मृतदेहांवर व्यवस्थित अंत्यसंस्कारदेखील होत नसल्याचं चित्र देशभरात पाहायला मिळत आहे. बिहारच्या बक्सरमध्ये जवळपास शंभरहून अधिक मृतदेह गंगा नदीत आढळून आले असताना आता कटिहारमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
आत्महत्येसाठी १२० किमी प्रवास; पुलावरून एकाचवेळी ५ जणांच्या उड्या, पण पुढे वेगळंच घडलं
कटिहारमधील एका रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी कोरोना बाधितांचे मृतदेह नदीत फेकल्याची घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडीओमध्ये रुग्णालयाचे कर्मचारी मृतदेहांना रुग्णवाहिकेतून बाहेर काढताना दिसत आहेत. त्यानंतर ते मृतदेहांना नदीत टाकतानाही दिसत आहेत. मृत्यूनंतरही रुग्णांचे हाल संपलेले नाहीत. त्यांच्या मृतदेहांची अतिशय असंवेदनशीलपणे विल्हेवाट लावली जात आहे. या व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर जिल्हा प्रशासनानं घटनेच्या तपासाचे आदेश दिले.
ज्याची कोरोना टेस्ट होतेय, 'तो' पॉझिटिव्ह येतोय; 'हा' जिल्हा सगळ्यांची चिंता वाढवतोय
प्रशासनानं रुग्णालयाच्या सिव्हिल सर्जनना नोटीस बजावली आहे. २४ तासांत अहवाल पाठवण्याचे आदेश त्यांना देण्यात आले आहेत. घटनेची चौकशी करून कारवाई करण्यात येईल अशी माहिती प्रशासनानं दिली आहे. गेल्या दोन दिवसांत गंगा नदीपात्रात १०० पेक्षा अधिक मृतदेह तरंगताना आढळून आले आहेत. हे मृतदेह उत्तर प्रदेशातून वाहून आल्याची माहिती बिहारमधील बक्सर प्रशासनानं दिली. यावरून बिहार विरुद्ध उत्तर प्रदेश प्रशासन असा वाददेखील पाहायला मिळाला.