VIDEO: इंजेक्शन देताना नर्स म्हणाली, 'तुम्ही काही दिवसांच्या सोबती'; दुसऱ्याच दिवशी कोरोना रुग्णाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2021 04:26 PM2021-05-09T16:26:13+5:302021-05-09T16:26:44+5:30
CoronaVirus News: नर्स देणाऱ्या इंजेक्शनचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल; मृत महिलेच्या कुटुंबियांकडून कारवाईची मागणी
ग्वाल्हेर: मध्य प्रदेशच्या ग्वाल्हेरमधील एका रुग्णालयाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ बिर्ला रुग्णालयातला आहे. या व्हिडीओनं सध्या सर्वत्र एकच खळबळ माजली आहे. व्हिडीओमध्ये एक नर्स कोरोना रुग्णाला इंजेक्शन देताना दिसत आहे. आता तुम्ही काही दिवसांच्याच सोबती असल्याचं नर्सनं इंजेक्शन देताना म्हटलं. नर्स अतिशय व्यवस्थितपणे रुग्णाशी बोलत होती. मात्र दुसऱ्याच दिवशी रुग्णाचा मृत्यू झाला. त्यानंतर आता महिलेचा इंजेक्शन देतानाच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
कोरोना लसीकरण केंद्र अन् उपलब्ध स्लॉट शोधताय? मग, 'हे' ऑनलाइन प्लॅटफॉर्म करतील तुम्हाला मदत
कोरोनाबाधित महिलेच्या मृत्यूनंतर तिच्या कुटुंबियांनी नर्स आणि डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी केली. कोरोनाची लागण झालेल्या वंदना अग्रवाल यांना २४ एप्रिलला बिर्ला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांचा शनिवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. उपचारात हयगय झाल्यानं महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप करत कुटुंबियांनी रुग्णालयात गोंधळ घातला. 'रुग्णालयात नर्स म्हणून काम करत असलेल्या चंद्रा बघेल यांनी माझ्या आईला शुक्रवारी इंजेक्शन दिलं. त्यावेळी चंद्रा बघेल यांनी आता तुम्ही काही दिवसांच्याच साथीदार असल्याचं म्हटलं होतं. तो व्हिडीओदेखील आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे,' असा आरोप बघेल यांची मुलगी वर्तिकानं केला आहे.
शुक्रवारी आईला इंजेक्शन देण्यात आलं. त्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी तिची प्राणज्योत मालवली. दुपारी दीडच्या सुमारास तिनं अखेरचा श्वास घेतला, असं वर्तिका यांनी सांगितलं. बघेल यांच्या कुटुंबातील सदस्यांनी रुग्णालयात गोंधळ घातल्यानंतर माजी आमदार मुन्नालाल गोयल आणि जिल्हाधिकारी कौशलेंद्र विक्रम सिंह रुग्णालयात पोहोचले. वर्तिका यांनी दिलेल्या माहितीनुसार, १४ एप्रिलला त्यांनी त्यांचे वडील सुरेंद्र यांनादेखील बिर्ला रुग्णासयात दाखल करण्यात आलं. २८ एप्रिलला त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. मात्र डिस्चार्ज मिळाल्यावर घरी पोहोचताच केवळ अर्ध्या तासातच त्यांचं निधन झालं. त्यांच्या उपचारांसाठी कुटुंबियांनी जवळपास ५ लाख रुपये खर्च केले होते.