CoronaVirus News: ...तर तुम्हीच माझ्या जागी कोविड युनिटमध्ये जा; डॉक्टरच्या ट्विटनं सारेच हेलावले
By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2021 08:19 AM2021-04-14T08:19:55+5:302021-04-14T08:20:47+5:30
CoronaVirus News: कोरोनाबाधितांच्या संख्येत दररोज वाढ होत असल्यानं आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटरवर
मुंबई: देशात गेल्या महिनाभरापासून कोरोना रुग्णांचा आकडा झपाट्यानं वाढत आहे. कोरोना रुग्ण वाढीच्या वेगानं अनेक राज्यांमधील आरोग्य यंत्रणाच व्हेंटिलेटरवर असल्याचं चित्र आहे. भारतानं कोरोना बाधितांच्या संख्येत ब्राझीलला मागे टाकलं आहे. आता केवळ अमेरिकाच भारताच्या पुढे आहे. गेल्या आठवडाभरापासून देशात कोरोनाचे १ लाखहून अधिक रुग्ण सापडत आहेत. कोरोनाचा वेग धडकी भरवणारा आहे. याचा सर्वाधिक ताण आरोग्य यंत्रणेवर आला आहे.
सोशल डिस्टन्सिंग पाळा, मास्क घाला असं आवाहन वारंवार करूनही सर्वसामान्य नागरिक नियम धाब्यावर बसवत आहेत. सार्वजनिक ठिकाणी होत असलेल्या गर्दीमुळे कोरोनाचा फैलाव वेगानं होत आहे. दररोज कोरोना बाधितांची धडकी भरवणारी आकडेवारी समोर येत आहे. मात्र तरीही अनेक जण गरज नसतानाही घराबाहेर पडत आहेत. याबद्दल एका डॉक्टरनं नाराजी व्यक्त केली आहे. डॉक्टर दीपशिखा घोष यांच्या ट्विटवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. हजारो लोकांनी त्यांचं ट्विट लाईक केलं आहे.
''कृपया, कृपया मास्क घाला. बाकीच्या लोकांचं मला माहीत नाही. पण शिफ्टच्या विचित्र वेळा आणि माझ्या संपूर्ण सेवा कालावधीत जितके मृत्यू पाहिले नाहीत, तितके मृत्यू पाहून मी मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या खूप थकले आहे. यानंतरही तुम्हाला काहीच वाटत नसेल तर कोविड युनिटमध्ये जाऊन माझ्या जागी काम करा. धन्यवाद,'' असं ट्विट करत डॉ. घोष यांनी त्यांच्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे.
It started weeks ago. Nobody bothered. They won’t be bothered till one person in every family is affected. Practising Preventative Medicine is impossible here. People just don’t get it. Idk if it’s complete disregard for public health or low IQ.
— Doctor (@DipshikhaGhosh) April 12, 2021
दीपशिखा घोष यांच्या ट्विटबद्दल भावनेबद्दल अनेकांनी सहवेदना व्यक्त केल्या. एका ट्विटर वापरकर्त्यानं कोरोनाची दुसरी लाट पुन्हा आली आहे का, अशी विचारणा केली. त्या प्रश्नालादेखील घोष यांनी उत्तर दिलं. ''काही आठवड्यांपासून रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. कोणालाही काळजी नाही. प्रत्येक कुटुंबातली एक व्यक्ती कोरोनाबाधित झाल्याशिवाय त्यांना फरक पडणार नाही,'' अशा शब्दांत घोष यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
It’s just heartbreaking.. Breaking news of death to family members over phone and hearing them scream and howl in shock and grief is the hardest thing I’ve ever had to sit through. I don’t think any HCW will ever be the same again.
— Doctor (@DipshikhaGhosh) April 12, 2021
सध्याची परिस्थिती हृदयद्रावक असल्याचं घोष यांनी पुढील ट्विटमध्ये म्हटलं आहे. ''परिस्थिती फारच हृदयद्रावक आहे. रुग्णांच्या मृत्यूची माहिती त्यांच्या कुटुंबियांना देणं आणि फोनवर त्यांचा आक्रोश ऐकणं काळीज हेलावून टाकणारं आहे. माझ्या आयुष्यातला हा सर्वाधिक कठीण काळ आहे. अशा परिस्थितीतून मी याआधी कधीही गेले नव्हते,'' असं घोष यांनी आणखी एका ट्विटमध्ये म्हटलं आहे.