CoronaVirus News : हृदयविकार, मधुमेहींसाठी कोरोना जीवघेणा; आरोग्यदायी जीवनशैली आवश्यक
By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2020 12:55 AM2020-05-20T00:55:47+5:302020-05-20T05:31:22+5:30
CoronaVirus News in Marathi and Live Updates : हृदय व रक्तवाहिनाशी संबंधित गंभीर आजार असलेल्या कोरोना रुग्णांचा मृत्यूदर १३ टक्क्यांपेक्षा जास्त आहे. त्या खालोखाल मधुमेह असताना कोरोना झाल्यास अशा रुग्णांमध्ये मृत्यूचे प्रमाण ९.२ टक्के आहे.
- टेकचंद सोनवणे
नवी दिल्ली : हृदय कमजोर असलेल्या कोरोना रुग्णांमध्ये मृत्यूचे प्रमाण जगात सर्वाधिक आहे. कोरोना हा जीवघेणा आजार नसला तरी उपचारास विलंब व आधीचे गंभीर आजार असलेल्यांना कोरोनाचा जास्त धोका असतो. हृदय व रक्तवाहिनाशी संबंधित गंभीर आजार असलेल्या कोरोना रुग्णांचा मृत्यूदर १३ टक्क्यांपेक्षा जास्त आहे. त्या खालोखाल मधुमेह असताना कोरोना झाल्यास अशा रुग्णांमध्ये मृत्यूचे प्रमाण ९.२ टक्के आहे. त्यामुळे जगभरातील तज्ज्ञांनी आरोग्यदायी जीवनशैलीवरच भर दिला आहे. कोणताही आजार नसल्यास कोरोनातून बरे होण्याचे प्रमाण लक्षणीय आहे.
श्वसनविकार, दमा, अस्थमा, ब्रोंकायटीस असलेल्यांना कोरोना झाल्यास अशा रुग्णांची अवस्था बिकट होते. या श्रेणीत ८ टक्के रुग्णांचा अंत आतापर्यंत झाला आहे. कर्करोग व त्यातून बरे झालेल्यांना कोरोनाची लागण झाल्यास अशांमध्ये मृत्यूदर ७.६ आहे. व्यस्त जीवनशैली, जंक फूड, व्यायामाचा अभाव, कामातील स्पर्धा, चंगळवादामुळे नव्या मानसिक आजारांचा विळखा घट्ट होत चालला आहे.
हायपरटेंशन असलेल्या रुग्णांना कोरोनाचा धोका जास्त आहे. अशावेळी कोरोनामुळेच घात होण्याची भिती वर्तवली जात आहे. या रुग्णांमध्ये कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण लक्षणीय ८.४ टक्के इतके आहे.
विशेष म्हणजे जन्मजात रोगप्रतिकार शक्तीमुळे ० ते ९ वयोगटातील रुग्णांमध्ये कोरोनामुळे मृत्यूचे प्रमाण शून्य आहे. सर्वाधिक मृत्यू ८० वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्यांना रुग्णांचे झालेत. जगभरात हे प्रमाण २१.९ टक्के इतके आहे.