CoronaVirus News: लस शोधली तरी कोरोना कायम राहण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2020 01:07 AM2020-05-30T01:07:55+5:302020-05-30T06:12:13+5:30
कोरोनाच्या आजारावर प्रतिबंधक लस शोधण्यासाठी अमेरिका, भारतापासून अनेक देशांकडून प्रयत्न सुरू आहेत.
वॉशिंग्टन : कोविड-१९ विषाणूवर जरी प्रतिबंधक लस शोधून काढण्यात यश आले तरी कोरोनाचा आजार आणखी अनेक वर्षे कायम राहाण्याची शक्यता आहे. एचआयव्ही, कांजिण्या, गोवर यासारखा कोरोनाचा आजारही भविष्यात विशिष्ट भागांमध्ये उद्भवत राहिल, असे अमेरिकेतील संसर्गजन्य रोग या विषयातील तज्ज्ञांचे मत आहे.
या तज्ज्ञांनी म्हटले आहे की, अमेरिकेमध्ये पसरलेली कोरोनाची साथ नियंत्रणात आणण्यासाठी आता कोणते उपाय योजले जातात, हे महत्त्वाचे आहे. आतापर्यंत जगात कोरोनाचे चार प्रकारचे विषाणू अस्तित्वात होते. ज्यांच्या संसर्गामुळे ताप, सर्दी, खोकला अशी सामायिक लक्षणे आढळून यायची. आता त्यात कोविड-१९ या कोरोनाच्या पाचव्या प्रकारच्या विषाणूची भर पडली आहे.या संदर्भात शिकागो विद्यापीठातील विषाणूतज्ज्ञ सारा कोबे यांनी सांगितले की, कोविड-१९ विषाणू हा अस्तित्वात राहणार असून, ते गृहित धरूनच लोकांनी आता जगायला शिकले पाहिजे.
संसर्गजन्य रोगांशी मुकाबला करण्यासाठी ठोस उपाययोजना तसेच राजकीय इच्छाशक्तीची गरज आहे असे या तज्ज्ञांचे मत आहे. सेंटर फॉर डिसिजेस कंट्रोल अँड प्रिव्हेेंशन या संस्थेचे माजी संचालक टॉम फ्रिडेन यांनी सांगितले की, जगभरात पसरणाऱ्या संसर्गजन्य साथींमुळे काय हानी होते याचा अनेक देशांना यापूर्वी फारसा अनुभव आला नव्हता. कोरोनाच्या आजारावर प्रतिबंधक लस शोधण्यासाठी अमेरिका, भारतापासून अनेक देशांकडून प्रयत्न सुरू आहेत. हा आजार झाल्यानंतर त्याला प्रतिबंध करण्यासाठी शरीरामध्ये तशी प्रतिकारक शक्ती निर्माण होते. पण ही मोठी प्रक्रिया आहे असेही विषाणूतज्ज्ञांनी सांगितले.
दूरदृष्टीचा अभाव
कोरोनाची साथ असूनही काही देशांनी अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये कोणतीही दूरदृष्टीचा विचार नाही. कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी सर्वसमावेशक प्रयत्नांची गरज आहे.