CoronaVirus News : देशातील 'या' ५ राज्यांत कोरोनाचा सर्वात मोठा धोका, आरोग्य मंत्रालयाचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2020 07:23 PM2020-10-27T19:23:36+5:302020-10-27T19:31:40+5:30
CoronaVirus News : गेल्या 24 तासांत केरळ, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, कर्नाटक आणि दिल्लीत 49.4 टक्के कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.
नवी दिल्ली : भारतातील अनेक राज्यांमध्ये सणासुदीच्या काळात कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका वेगाने वाढत आहे. केरळ, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, कर्नाटक आणि दिल्लीमध्ये सणांमुळे कोरोना संसर्गाचे प्रमाण वाढले आहे. मात्र, दिलासादायक बाब म्हणजे, गेल्या पाच आठवड्यात कोरोना रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण कमी झाले आहे, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी पत्रकार परिषदेत सांगितले.
फक्त पाच राज्यांत 49.4% प्रकरणे
गेल्या 24 तासांत केरळ, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, कर्नाटक आणि दिल्लीत 49.4 टक्के कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. सणसुदीचा काळ सुद्धा याला एक मोठे कारण असू शकते, असे आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सांगितले. तसेच, ही अत्यंत चिंतेची बाब आहे आणि आम्ही या राज्यांमधील सरकारसोबत सतत बोलतो आहोत. कोरोनाचे एकूण अॅक्टिव्ह प्रकरणांपैकी 78 टक्के प्रकरणे देशातील 10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये आहेत, असे राजेश भूषण म्हणाले.
गेल्या पाच आठवड्यात मृत्यूचे प्रमाण
गेल्या 24 तासांत कोरोनामुळे झालेल्या मृत्यूची 58 टक्के प्रकरणे पाच राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये दिसून आली आहेत. यामध्ये महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, दिल्ली, छत्तीसगड आणि कर्नाटकचा समावेश आहे. मात्र, गेल्या पाच आठवड्यापासून कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचा आलेख भारतात खाली आला आहे. दरम्यान, भारतात कोरोनामुळे आतापर्यंत 1 लाखाहून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
युरोप, अमेरिकेत आधीपेक्षा परिस्थिती बिकट
कोरोनामुळे पुन्हा एकदा युरोपियन देशांमध्ये हाहाकार माजला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये कोरोनाची लाट ओसरताना दिसत होती. मात्र आता अचानक युरोपमधील देशांमध्ये कोरोनाच्या प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे. याबाबत माहिती देताना निती अयोगचे सदस्य डॉ. व्ही. के पॉल म्हणाले की, हा साथीची रोग युरोपमधील बर्याच देशांमध्ये खूप वेगाने वाढताना दिसत आहे.
युरोपियन देशांमध्ये कोरोनाची दुसरी लाट पहिल्या आलेल्या लाटेपेक्षा जास्त मोठी दिसते. येथील लोकांवर कोरोनाचे संकट ओढावले आहे. याठिकाणी पुन्हा एकदा महामारी शिगेला पोहोचली आहे. अमेरिकेत तर कोरोनाच्या तिसर्या लाटेच्या क्रोधाचा सामना लोकांना करावा लागत आहे. अमेरिकेत सध्या कोरोनावर 28 लाखांहून अधिक अॅक्टिव्ह रुग्ण आहेत, असे नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्हीके पॉल म्हणाले.