CoronaVirus News: कोवॅक्सिननं भरलेला कंटेनर बेवारस स्थितीत सापडला; चालक-वाहक दोघेही गायब
By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2021 11:13 AM2021-05-01T11:13:30+5:302021-05-01T11:14:04+5:30
CoronaVirus News: कंटेनरमध्ये कोरोना लसीचे २ लाख ४० हजार डोस; हैदराबादहून पंजाबकडे निघाला होता कंटेनर
भोपाळ: देशात कोरोनानं अक्षरश: थैमान घातलं आहे. देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढत आहे. कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत असल्यानं लसीकरण मोहिमेचा वेग वाढवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र देशात सर्वत्र कोरोना लसींचा तुटवडा जाणवत आहे. मात्र मध्य प्रदेशात लसींच्या वाहतुकीत मोठा बेजबाबदारपणा झाल्याचं उघडकीस आलं आहे.
मध्य प्रदेशच्या नहसिंहपूरमधील करेली बस स्थानकाजवळ रस्त्याच्या कडेला एक कोल्ड चेनचा कंटेनर बेवारस अवस्थेत सापडला. हा कंटेनर चालू स्थितीत होता. त्यात कोरोना लसींचे २ लाख ४० हजार डोस होते. एक कंटेनर चालू स्थितीत रस्त्याच्या कडेला बराच वेळ चालू स्थितीत उभा असल्याची माहिती करेली पोलिसांना मिळाली. या कंटेनरमध्ये चालक, वाहक उपस्थित नव्हते. पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
देशात कोरोनाचा हाहाकार! पहिल्यांदाच रुग्णसंख्या ४ लाख पार; जगातील विक्रमी वाढ
पोलिसांनी कंटेनरमध्ये असलेली कागदपत्रं तपासली. हा कंटेनर गुरुग्रामच्या टीसीआय कोल्ड चेन सोल्युशन कंपनीच्या मालकीचा असून तो भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन लसींचे २ लाख ४० हजार डोस हैदराबादहून पंजाबच्या कर्नालला घेऊन जात असल्याची माहिती कागदपत्रांतून पोलिसांना समजली. कंटेनरमध्ये पोलिसांना ३६४ मोठे खोके आढळले. त्यात कोवॅक्सिन लसींचा साठा होता. त्यांची एकूण किंमत ८ कोटी रुपये इतकी होती.
VIDEO: माझी आई मरेल हो...! मुलगा ओरडत राहिला; पोलिसांनी VIPसाठी ऑक्सिजन सिलिंडर हिसकावला
पोलिसांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून कंटेनरच्या चालकाचा मोबाईल नंबर मिळवला. यानंतर पोलिसांनी मोबाईल नंबरच्या माध्यमातून चालकाचं लोकेशन शोधण्याचा प्रयत्न केला. चालकाचा मोबाईल नरसिंहपूर बायपासच्या पुढे असलेल्या चौपदरी मार्गाच्या शेजारी असलेल्या झुडूपांमध्ये पडलेला आढळून आला. पोलिसांना अद्याप तरी कंटेनरचा वाहक आणि चालक यांचा ठावठिकाणा सापडलेला नाही.