CoronaVirus News: भारतात किती असणार कोरोना लसीची किंमत?; समोर आला आकडा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2020 02:14 AM2020-10-06T02:14:48+5:302020-10-06T06:46:04+5:30
CoronaVirus Vaccine Price in India: लसीकरणासाठी भारताला येणार ५० हजार कोटी खर्च
- हरीश गुप्ता
नवी दिल्ली : येत्या वर्षभरात देशातील २० ते २५ कोटी लोकांना कोरोना लस टोचण्यासाठी भारताला सुमारे ५० हजार कोटी रुपये खर्च करावे लागतील. कोरोना प्रतिबंधक लसीच्या एका डोसची किंमत चार ते पाच डॉलर म्हणजेच सुमारे ३०० ते ४०० रुपये असण्याची शक्यता आहे. त्यानुसार एकूण खर्चाचा अदमास लावण्यात आला आहे.
ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (डीसीजीआय) यांनी संकेत दिले आहेत की, कोरोना प्रतिबंधक लसीच्या एका डोसची किंमत एक हजार रुपयांपेक्षा कमीच असेल. २० ते २५ कोटी लोकांना कोरोना प्रतिबंधक लस द्यायची झाल्यास त्यासाठी ४० ते ५० कोटी डोसची आवश्यकता भासणार आहे.
भारताला कोरोना देण्याचे आश्वासन जागतिक आरोग्य संघटना, गेट्स फाऊंडेशनप्रणित ग्लोबल व्हॅक्सिन अलायन्स (गावी), लसउत्पादन क्षेत्रातील भारतीय कंपन्यांनी दिले आहे.
ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या लसीचे सिरम इन्स्टिट्यूट उत्पादन करणार आहे. अमेरिका, इंग्लंड, युरोप व अन्य खंडातील काही देशांनी कोरोना लस विकसित करण्यासाठी संशोधन करणाऱ्या औषध कंपन्यांना त्याचा मोबदला देऊ केला आहे. मात्र भारत सरकारने असा मोबदला कंपन्यांना दिलेला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेमलेल्या कृती गटाचे प्रमुख डॉ. व्ही. के. पॉल जगभरातील कोरोना लस घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत.
प्रयोगांवर भारताच्या आशा
भारतात कोरोना प्रतिबंधक लस प्रत्येकाला देण्यासाठी ८० हजार कोटी रुपये खर्च येईल असा अंदाज सिरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदर पूनावाला यांनी व्यक्त केला होता. केंद्र सरकारने व्यक्त केलेला अंदाजित आकडा त्याहूनही कमी आहे.
ऑक्सफर्ड विद्यापीठ तसेच भारत बायोटेक-आयसीएमआर हे स्वतंत्ररीत्या कोरोना लस शोधण्यासाठी करीत असलेल्या प्रयोगांवर भारताच्या आशा आहेत.