CoronaVirus News: भारतातही होता कोरोनाचा नवा विषाणू, पण ठरला अल्पजीवी; आणखी विषाणूंची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2020 01:03 AM2020-12-27T01:03:54+5:302020-12-27T07:05:33+5:30
‘आयजीआयबी’ च्या संचालकांची माहिती; आणखी विषाणूंची शक्यता
नवी दिल्ली : गेल्या मार्च महिन्यापासून कोरोना विषाणूमध्ये होणाऱ्या परिवर्तनावर भारतीय शास्त्रज्ञ बारीक लक्ष ठेवून आहेत. कोरोनाच्या मूळ विषाणूतून काही नवे विषाणू उत्पन्न झाले. त्यापैकी एका विषाणूकडे मोठी संसर्गक्षमता होती, पण तो कालांतराने मृत झाला, असे इन्स्टिट्यूट ऑफ जिनोमिक्स ॲण्ड इंटेग्रेटिव्ह बायोलॉजी (आयजीआयबी)चे संचालक अनुराग अग्रवाल यांनी म्हटले आहे.
ते म्हणाले की, भारतामध्येही कोरोना रुग्णांची संख्या लक्षणीय आहे. आपल्या देशातही कोरोनाच्या आणखी नव्या विषाणूंची उत्पत्ती झाल्यास आश्चर्य वाटू नये. इंग्लंडमध्ये कोरोनाच्या आढळून आलेल्या नव्या विषाणूमुळे जगभर घबराट निर्माण झाली आहे. या नव्या विषाणूचे रुग्ण फ्रान्ससहित इतर देशांतही आढळले आहेत. त्या पार्श्वभूमीवर भारतीय शास्त्रज्ञांनी कोरोनाच्या नव्या विषाणूंबाबत केलेले निरीक्षण महत्त्वाचे आहे.
अनुराग अग्रवाल म्हणाले की, मार्च ते मे महिन्यादरम्यान देशामध्ये कोरोना संसर्गाचा मोठ्या प्रमाणावर फैलाव झाला होता. दक्षिण आशियामध्ये कोरोना विषाणूत जनुकीय परिवर्तन होऊन ए ४ हा नवा विषाणू जन्माला आला. त्याच्याकडे मोठी संसर्गशक्ती होती. या नव्या विषाणूचा शोध दिल्ली, कर्नाटक, हैदराबादमधील रुग्णांच्या कोरोना चाचण्यांतून लागला. मात्र हा विषाणू जूनमध्ये मृत झाला. त्यामुळे या नव्या विषाणूबद्दल भारतात काहीही चर्चा झाली नाही तसेच घबराट निर्माण होण्याचाही प्रश्न नव्हता.
केरळ राज्याची मोलाची कामगिरी
एखाद्या कोरोना विषाणूचा मूळ विषाणू शोधून काढण्यासाठी जीन सिक्वेन्सिंगचे तंत्र वापरण्याचा प्रस्ताव सर्वप्रथम केरळने ठेवला. त्या दिशेनेच नंतर काम झाल्यामुळेच देशात कोरोना विषाणूच्या परिवर्तनावर लक्ष ठेवणे व या आजारावर योग्य ते उपचार करणे अधिक सुलभ झाले, असेही आयजीआयबी संस्थेचे संचालक अनुराग अग्रवाल यांनी सांगितले.