CoronaVirus News: कोरोनाचा आलेख खाली; भारतीयांची प्रतिकारशक्ती अधिक!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2020 11:36 PM2020-07-21T23:36:43+5:302020-07-22T06:41:02+5:30
देशातील अन्य काही भागांतही कोरोनाने सर्वोच्च पातळी गाठून झाली असण्याची शक्यता आहे.
नवी दिल्ली : देशातील कोरोना विषाणूंच्या संसर्गाबद्दल एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी अतिशय महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. डॉ. गुलेरिया म्हणाले, देशातील काही भागांत कोरोनाने सर्वोच्च शिखर गाठले आहे असे सध्याच्या स्थितीवरून म्हणता येईल. मुंबई व अहमदाबाद या दोन शहरांमध्ये कोरोनाची सर्वोच्च पातळी येऊन गेल्याची शक्यता आहे. दिल्ली, मध्य मुंबई व अहमदाबादमध्ये सर्वोच्च शिखर गाठल्यानंतर तेथील साथीचा आलेख काहीसा खाली येऊ लागला आहे.
देशातील अन्य काही भागांतही कोरोनाने सर्वोच्च पातळी गाठून झाली असण्याची शक्यता आहे. मात्र काही राज्यांमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या आता वाढताना दिसत आहे. तिथे कोरोनाचा सर्वोच्च स्तर गाठून रुग्णसंख्या कमी होत जाण्यास काहीसा वेळ लागू शकेल.
इतर देशांच्या तुलनेत भारत आणि मध्य आशियाई देशांमध्ये कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण कमी आहे. कोरोनामुळे इटली आणि स्पेनमध्ये जे घडले आणि जे अमेरिकेत घडत आहे, ते भारतात घडलेले नाही, असेही डॉ. गुलेरिया यांनी सांगितले. भारतीयांमध्ये कोरोनाशी लढण्याची प्रतिकारशक्ती आपोआप तयार झाली असावी, भारतात कोरोनामुळे होणारा मृत्यूदर त्यामुळेच कमी झाला असावा, अशी शक्यता त्यांनी वर्तवली.
37148 नवे बाधित आढळले आहेत. त्यामुळे आतापर्यंतच्या रुग्णांची संख्या ११ लाख ५५ हजार १९१ वर गेली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी दिलेल्या माहितीनुसार मागील २४ तासांत ५९७ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. त्यामुळे देशातील कोरोनाच्या बळींचा आकडा 28084 झाला आहे. मात्र मृत्युदर आता अडीच टक्क्यांहून काहीसा खाली आला असून, अन्य देशांच्या तुलनेत हा खूपच कमी आहे.
देशात रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढत चालले आहे. एकूण 1155191 रुग्णांपैकी ७ लाख २४ हजार ५७८ जणांनी या संसर्गजन्य आजारावर मात केली आहे आणि आजच्या घडीला ४ लाख २ हजार ५२९ जणांवर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत.