CoronaVirus News: दिलासादायक! देशाचा मृत्युदर ३.३६ टक्क्यांवरून २.४३ पर्यंत घसरला
By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2020 01:34 AM2020-07-23T01:34:27+5:302020-07-23T06:42:34+5:30
कोरोना साथीचा नियोजनबद्धरित्या मुकाबला केल्यानेच हे यश साध्य झाले आहे.
नवी दिल्ली : कोरोना रुग्णांची योग्यवेळी होणारी चाचणी व उत्तम उपचार यामुळे १७ जून रोजी देशातील मृत्यूदर ३.३६ टक्क्यांवरून २.४३ पर्यंतखाली घसरला असे केंद्रीय आरोग्य खात्याने म्हटले आहे. या खात्याचे वरिष्ठ अधिकारी राजेश भूषण यांनी बुधवारी सांगितले की, कोरोना साथीचा नियोजनबद्धरित्या मुकाबला केल्यानेच हे यश साध्य झाले आहे.
राष्ट्रीय स्तरावरील मृत्यूदर ८.०७ टक्के असून त्यापेक्षा तीस राज्ये व केंद्रशासित प्रदेशांतील मृत्यूदर कमी आहे. १९ राज्ये व केंद्रशासित प्रदेश दररोज दर दहा लाखांमागे १४०हून अधिक कोरोना चाचण्या करत आहेत. नुसत्या चाचण्या करून उपयोग नाही तर कोरोनाचा संसर्ग फैलावू नये म्हणून प्रत्येक राज्याने प्रभावी उपाययोजनाही केली पाहिजे.
राजेश भूषण यांनी सांगितले की, कोरोना रुग्णांची संख्या कमी करण्यासाठी प्रत्येक राज्य व केंद्रशासित प्रदेशाने दररोज दर दहा लाख लोकांमागे १४० चाचण्या तरी करायलाच हव्यात. त्यामुळे रुग्णांवर वेळीच उपचार करता येतील. या कृतीमुळे संसर्ग झालेल्या रुग्णांचे प्रमाण १० टक्क्यांवर आणता येईल. त्यानंतर हे प्रमाण ५ टक्के किंवा त्याहून कमी करण्यासाठी राज्य व केंद्रशासित प्रदेशांनी आणखी प्रयत्न करावेत.
केंद्रीय आरोग्य खात्याचे अधिकारी राजेश भूषण म्हणाले की, इतरांच्या तुलनेत भारताने कोरोना साथीचा अधिक चांगल्या प्रकारे मुकाबला केला आहे. त्यासाठी देशातील सर्व राज्यांना केंद्र सरकार संपूर्ण सहकार्य करत आहे.
जगात सर्वात कमी मृत्यू
भारतामध्ये दर दहा लाख लोकांमागे कोरोनाने मरण पावणाऱ्यांचे प्रमाण २०.४ टक्के असून ते जगातले सर्वात कमी प्रमाण आहे. असे अनेक देश आहेत की जिथे दर दहा लाख लोकांमागे कोरोनामुळे मरण पावणाऱ्यांचे प्रमाण भारतापेक्षा २३ किंवा ३३ पट अधिक आहे. जागतिक पातळीवर दर दहा लाख लोकांमागे कोरोनामुळे ७७ जण मरण पावतात.