CoronaVirus News: दिल्लीतील एम्समध्ये ३० वर्षे वयाच्या व्यक्तीला दिली कोव्हॅक्सिन लस; मानवी चाचण्यांना प्रारंभ
By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2020 02:08 AM2020-07-25T02:08:56+5:302020-07-25T06:40:10+5:30
दुष्परिणाम नाहीत
नवी दिल्ली : भारतात बनविलेल्या कोव्हॅक्सिन या लसीच्या मानवी चाचण्यांना दिल्लीतील एम्समध्ये सुरूवात झाली असून ३० वर्षे वयाच्या व्यक्तीस शुक्रवारी ही लस सर्वप्रथम देण्यात आली. त्या लसीचे या व्यक्तीला कोणतेही दुष्परिणाम जाणवले नाहीत.
भारत बायोटेक, पुण्याची नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ व्हायरॉलॉजी (एनआयव्ही), इंडियन कौन्सिल आॅफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) या तीन संस्था या प्रकल्पात सहभागी आहेत. कोव्हॅक्सिनच्या मानवी चाचण्यांचा पहिला व दुसरा टप्पा पार पाडण्यास केंद्र सरकारने एम्ससहित देशातील १२ वैद्यकीय संस्थांना परवानगी दिली आहे. दिल्लीतील तरुणाला लसीचा ०.५ मिलिचा डोस शुक्रवारी दुपारी देण्यात आला.
देशामध्ये २४ तासात ४९,३१० नवे रुग्ण
देशात विक्रमी संख्येने रुग्ण बरे झाल्यानंतरच्या दुसऱ्याच दिवशी शुक्रवारी एकाच दिवशी कोरोनाचे ४९ हजारांपेक्षा अधिक रुग्ण आढळून आले असून ही आजवरची सर्वाधिक वाढ आहे. त्यामुळे कोरोनाच्या रुग्णांची एकूण संख्या १२ लाख ८७ हजारपेक्षा अधिक झाली आहे.
देशात कोरोनाच्या आजाराने शुक्रवारी ७४० जणांचा बळी गेला. त्यामुळे एकूण बळींची संख्या ३०,६०१ झाली आहे.
एकाच दिवसात कोरोनाचे ४५ हजारपेक्षा जास्त रुग्ण आढळून आले होते तर त्याच्या दुसºया दिवशी हीच संख्या ४९,३१० इतकी झाली. केंद्रीय आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार देशातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या शुक्रवारी १२,८७,९४५ झाली आहे. सध्या देशात ४,४०,१३५ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत तर ८,१७,२०९ जण कोरोनाच्या आजारातून पूर्णपणे बरे झाले आहेत.
राज्यात ५६ टक्के रुग्ण बरे
मुंबई : राज्यात शुक्रवारी दिवसभरात कोरोनाचे ५७१४ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५५.९९ टक्के असून आतापर्यंत एकूण १ लाख ९९ हजार ९६७ जण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात शुक्रवारी कोरोनाच्या ९६१५ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या १ लाख ४३ हजार ७१४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी शुक्रवारी दिली. आतापर्यंत पाठविलेल्या १७ लाख ८७ हजार ३०६ नमुन्यांपैकी ३ लाख ५७ हजार ११७ नमुने पॉझिटिव्ह (१९.९८ टक्के) आले आहेत. राज्यात ८ लाख ८८ हजार ९७६ लोक होम क्वारंटाइन असून ४५ हजार ८३८ लोक संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.