CoronaVirus News: मोठा दिलासा! कोरोनाची तिसरी लाट येणार, पण...; तज्ज्ञांच्या एकमतानं चिंता मिटली
By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2021 02:07 PM2021-06-03T14:07:50+5:302021-06-03T14:08:18+5:30
CoronaVirus News: तज्ज्ञांसह डॉक्टरांचं एकमत; तिसरी लाट येणार, पण लहान मुलांना सर्वाधिक धोका नाही
मुंबई: देशात आलेली कोरोनाची दुसरी लाट ओसरताना दिसत आहे. गेल्या काही आठवड्यांपासून देशातील कोरोना रुग्णांचा आकडा कमी होत आहे. मे महिन्याचा पहिल्या आठवड्यात देशात दररोज ४ लाखांहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद व्हायची. आता हाच आकडा दीड लाखांच्या खाली आला आहे. कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना तिसऱ्या लाटेचा धोका काय आहे. तिसऱ्या लाटेचा सर्वाधिक धोका लहान मुलांना असेल अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. अनेक तज्ज्ञांनी याबद्दल धोक्याचा इशारा दिला आहे.
जगातील सर्वात स्वस्त लस भारतात येणार?; कोरोना लसीकरणाचा वेग वाढणार
गेल्या महिनाभरात एकट्या अहमदनगर जिल्ह्यात १० हजारांहून अधिक लहान मुलांना कोरोनाची लागण झाल्यानं प्रशासनाची चिंता वाढली. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी मुंबईत तयारी सुरू झाली आहे. लहान मुलांसाठी बेड तयार केले आहेत. मात्र तिसऱ्या लाटेबद्दल लोकांच्या मनात अनाठायी भीती आहे. पालकांच्या मनात नाहक भीती निर्माण करण्यात आल्याचं मत बालरोगतज्ज्ञ व्यक्त करत आहेत. तिसऱ्या लाटेत मुलांना सर्वाधिक धोका नाही. मात्र तसं वातावरण निर्माण केलं जात असल्याचं मत तज्ज्ञ व्यक्त करताना दिसत आहेत.
तिसऱ्या लाटेचं प्रमुख लक्ष्य लहान मुलं असतील याची शक्यता अतिशय कमी असल्याचं गेल्याच आठवड्यात इंडियन ऍकॅडमी ऑफ पीडियाट्रिक्सनं (आयएपी) सांगितलं. तिसऱ्या लाटेत कोरोना रुग्णांचा आकडा जास्त असल्यास लहान मुलांचा आकडादेखील जास्त असेल, असं आयएपीनं म्हटलं आहे. 'कोरोनाचा जितका धोका वयस्कर व्यक्तींना आहे, तितकाच धोका लहान मुलांना आहे,' असं लहान मुलांमधील साथीचे रोगतज्ज्ञ डॉ. तनु सिंघल यांनी सांगितलं.
स्पुटनिक लसीचं उत्पादन करण्याची परवानगी द्या; सीरमचा DCGIकडे अर्ज
एका डायग्नॉस्टिक कंपनीनं देशातील अनेक शहरांमध्ये सर्वेक्षण केलं. त्यात १० ते १७ वयोगटातील एक चतुर्थांश मुलांच्या शरीरात अँटिबॉडीज आढळून आल्या. मात्र तरीही कोरोनाची लागण झालेल्या अनेकांमध्ये लक्षणं आढळून आली नव्हती. राज्य सरकारच्या माहितीनुसार, एकूण कोरोना रुग्णांमध्ये लहान मुलांचं प्रमाण १० टक्के इतकं आहे. 'कोरोनाची लागण झालेली ९९ टक्के मुलं घरातच बरी होतात. गेल्या तीन महिन्यांत १८ वर्षांखालील मुलांना न्युमोनियाची लागण झाल्याच्या केवळ दोन घटना समोर आल्या आहेत,' असं डॉ. सिंहल यांनी सांनी सांगितलं. सिंहल मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात पूर्णवेळ तज्ज्ञ आहेत.