CoronaVirus News: देशात कोरोनामुळे होणारे मृत्यू घटले; नवे रुग्णही कमी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2021 06:41 AM2021-06-05T06:41:56+5:302021-06-05T06:42:13+5:30
सक्रिय रुग्णांची संख्या १६ लाख ३५ हजार
नवी दिल्ली : देशात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंमध्येही घट होत आहे. शुक्रवारी या संसर्गामुळे २,७१३ जण मरण पावले. गुरुवारपेक्षा हा आकडा १७४ ने कमी आहे. नव्या रुग्णांची संख्याही दिवसेंदिवस कमी होत असून शुक्रवारी १ लाख ३२ हजार ३६४ नवे रुग्ण सापडले व २ लाख ७ हजार ७१ जण बरे झाले.
देशात कोरोना रुग्णांची एकूण संख्या २ कोटी ८५ लाख ७४ हजार ३५० आहे. त्यातील २ कोटी ६५ लाख ९७ हजार ६५५ जण बरे झाले. कोरोनामुळे बळी गेलेल्यांची संख्या ३ लाख ४० हजार ७०२ इतकी आहे. कोरोनातून बरे होणाऱ्यांचे प्रमाण लक्षणीय असून ते आता ९३.०८ टक्के झाले आहे. तर संसर्ग होण्याचे प्रमाण आता ६.५ टक्के आहे. देशामध्ये सलग ४५ व्या दिवशी दररोज २ हजारपेक्षा जास्त बळी गेले आहेत. सक्रिय रुग्णांची संख्या १६ लाख ३५ हजार ९९३ असून ती गुुरुवारपेक्षा ७७ हजार ८२० ने कमी आहे. सक्रिय रुग्णांच्या संख्येत सातत्याने घट होत आहे. सलग २२ व्या दिवशी नव्या रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या अधिक आहे. जगामध्ये १७ कोटी २९ लाख कोरोना रुग्ण असून त्यातील १५ कोटी ५८ लाख जण बरे झाले.
अमेरिका भारताला कोविड लस देणार
वॉशिंग्टन : भारताला कोविड-१९ वरील जीवरक्षक लसीच्या लाखो मात्रा पाठविण्याचा निर्णय बायडेन प्रशासनाने घेतल्याची माहिती अमेरिकेच्या उपाध्यक्ष कमला हॅरिस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गुरुवारी फोनद्वारे दिली.
हॅरिस मेक्सिको आणि गुआतेमालाच्या प्रमुखांशीही फोनवर बोलल्या. बायडेन प्रशासन जूनअखेर जगात किमान ८० दशलक्ष लस वितरित करणार आहे. त्यातील पहिल्या २५ दशलक्ष लस मात्रा या देशांना देणार आहे.
जगभरात दिले दोन अब्जांपेक्षा जास्त डोस
जगभरामध्ये कोरोना लसींचे दोन अब्जांपेक्षा जास्त डोस लोकांना देण्यात आले आहेत. कोरोना लसीकरणाची मोहीम जगभरात सुरू होऊन सहा महिने उलटले आहेत. जगात लसीकरणामध्ये इस्रायल आघाडीवर असून तेथील दहापैकी सहा लोकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे.