CoronaVirus News : दिल्लीत २९६१ कच्च्या कैद्यांचा जामीन हायकोर्टाने वाढविला
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2020 03:58 AM2020-06-23T03:58:42+5:302020-06-23T03:58:52+5:30
CoronaVirus News : आधीच्या अटींच्या आधारे ते आणखी ४५ दिवस कारागृहाबाहेर राहू शकतील, असे उच्च न्यायालयाने सोमवारी स्पष्ट केले.
नवी दिल्ली : दिल्लीच्या विविध कारागृहांतील २९६१ कच्च्या कैद्यांच्या जामिनाची मुदत दिल्ली उच्च न्यायालयाने ४५ दिवसांनी वाढविली आहे. त्यामुळे ते कैदी आणखी ४५ दिवस कारागृहाबाहेर राहू शकतील. कारागृहांमध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ वा वाढू नये, यासाठी देशभरात सर्वत्र कच्चे कैदी व किरकोळ गुन्हेगार यांना जामिनावर सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. दिल्लीच्या कारागृहांत ९६१ कैदी असे आहेत, की त्यांच्यावरील गुन्हे अद्याप सिद्ध झालेले नाहीत. त्यांना याआधीच सोडण्यात आले. जामिनाची मुदत संपेल, त्या दिवसापासून आधीच्या अटींच्या आधारे ते आणखी ४५ दिवस कारागृहाबाहेर राहू शकतील, असे उच्च न्यायालयाने सोमवारी स्पष्ट केले. या प्रकरणातील पुढील सुनावणी ५ आॅगस्ट रोजी होईल.
कैद्यांचा जामीन वाढवावा का, याचा विचार करण्यासाठी न्यायालयाने न्या. हिमा कोहली यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती. या समितीने म्हटले आहे की, विषाणूचा प्रादुर्भाव कधी संपेल आणि फिजिकल डिस्टन्सिंग गरज नाही, अशी स्थिती कधी येईल, हे सध्या सांगणे शक्य नाही. त्यामुळे कच्च्या कैद्यांचा जामीन वाढवणे, हाच एकमेव उपाय आता दिसत आहे.
या प्रकरणावरील सुनावणीच्या वेळी कैद्यांचा जामीन वाढविण्यास आमची हरकत नाही, असे दिल्ली सरकारतर्फे सांगण्यात आले. दिल्लीच्या विविध कारागृहांमध्ये १0 हजार कैद्यांना ठेवण्याची सोय असताना, प्रत्यक्षात तिथे जवळपास १८ हजार कैद्यांना ठेवण्यात आले होते.