CoronaVirus News: मार्चमध्ये लसीचा दुसरा डोस घेतलेल्या डॉक्टरचं कोरोनामुळे निधन; रुग्णालयावर शोककळा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2021 05:53 PM2021-05-09T17:53:52+5:302021-05-09T17:54:13+5:30
CoronaVirus News: मार्चच्या पहिल्याच आठवड्यात घेतला होता कोरोना लसीचा दुसरा डोस; १० ते १२ दिवसांपूर्वी झालं कोरोनाचं निदान
दिल्ली: कोरोना लसीचे दोन डोस घेतल्यानंतरही एका डॉक्टरचं कोरोनामुळे निधन झाल्याची घटना दिल्लीत घडली आहे. दिल्लीच्या सरोज रुग्णालयात ही घटना घडली आहे. डॉ. अनिल कुमार रावत असं मृत पावलेल्या डॉक्टरांचं नाव आहे. प्रकृती खालावल्यानं त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. मात्र शनिवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचं वय ५८ वर्षे होतं. मार्चमध्येच त्यांनी कोरोना लसीचा दुसरा डोस घेतला होता.
भारतात पुढील ३ महिन्यांत कोरोनाचा हाहाकार, १० लाख लोकांचा होणार मृत्यू; लॅन्सेटचा गंभीर इशारा
मी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. त्यामुळ मी लवकरच कोरोनावर मात करेन, असा विश्वास रावत यांना होता. त्यांनी ही गोष्ट त्यांच्या सहकाऱ्यांकडे बोलूनही दाखवली होती. रावत १९९६ पासून सरोज रुग्णालयात कार्यरत होते. अतिशय सभ्य माणूस, उत्तम सहकारी अशी त्यांची ओळख होती. मार्च महिन्याच्या सुरुवातीला त्यांनी कोविशील्ड लसीचा दुसरा डोस घेतला होता.
कोरोना लस पुरवठ्याबद्दल कोणीही भारताला लेक्चर देऊ नये; फ्रान्सचे पंतप्रधान कडाडले
डॉ. अनिल कुमार रावत मला माझ्या मोठ्या मुलाप्रमाणे होते, अशा शब्दांत रुग्णालयाचे कार्यकारी संचालक डॉ. पी. के. भारद्वाज यांनी त्यांच्या भावना बोलून दाखवल्या. 'मौलाना आझाद वैद्यकीय महाविद्यालयातून त्यांनी एमएस सर्जरी केली. आरबी जैन रुग्णालयातील युनिटमधून त्यांनी १९९४ मध्ये स्वत:च्या कारकिर्दीला सुरुवात केली. शेवटच्या श्वासापर्यंत ते माझ्यासोबत होते,' असं भारद्वाज यांनी सांगितलं.
१० ते १२ दिवसांपूर्वी अनिल कुमार रावत यांना कोरोनाची लागण झाली. सुरुवातीला ते घरीच आयसोलेशनमध्ये होते. मात्र त्यानंतर त्यांच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी खालावली. त्यामुळे त्यांना सरोज रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डॉ. भारद्वाज आणि त्यांच्या पूर्ण टीमनं रावत यांचा जीव वाचवण्यासाठी प्रयत्नांची शर्थ केली. 'त्यांना वाचवण्यासाठी आम्ही हरतऱ्हेचे प्रयत्न केले. मात्र आम्हाला यश आलं नाही. आमच्यासाठी ही खूप मोठी हानी आहे,' असं भारद्वाज म्हणाले.