CoronaVirus News: दिलासादायक! महिनाभरात ओसरेल कोरोनाचा कहर; केंद्र सरकारच्या तज्ज्ञ समितीचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2021 01:51 AM2021-02-24T01:51:59+5:302021-02-24T06:46:42+5:30
लसीकरण मोहिमेमुळेही विषाणूचा फैलाव मोठ्या प्रमाणात आटोक्यात
नवी दिल्ली : गेल्या काही महिन्यांत घसरणीला लागलेला कोरोनाचा आलेख मागील काही दिवसांपासून पुन्हा वरचढ होऊ लागला आहे. निर्बंधांमध्ये आलेली शिथिलता त्यासाठी काही प्रमाणात कारणीभूत आहे. तरीही जगाच्या तुलनेत भारतात अजूनही कोरोनाचे प्रमाण कमीच आहे. तसेच लसीकरण मोहिमेमुळेही विषाणूचा फैलाव आटोक्यात आला आहे.
तूर्तास कोरोनाचा आलेख चढता असला तरी मार्चच्या अखेरपर्यंत बाधितांची संख्या कमी होईल, असा दावा राजीव करंदीकर (चेन्नई मॅथेमॅटिकल इन्स्टिट्यूट), डॉ. शेखर मांडे (सीएसआयआर मुख्यालय) आणि प्राध्यापक एम. विद्यासागर (आयआयटी, हैदराबाद) या तज्ज्ञांनी एका लेखात केला आहे. ‘द केस ऑफ रॅपिड व्हॅक्सिनेशन ऑफ इंडिया ॲण्ड रेस्ट ऑफ द वर्ल्ड’ असे या लेखाचे शीर्षक आहे. तीनही लेखक केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान खात्यातर्फे नियुक्त करण्यात आलेल्या नॅशनल सुपरमॉडेल कमिटीचे सदस्य आहेत.
लसीचा परिणाम
कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन लसी दिल्या जात आहेत. या लसींमुळे कोरोनापासून दीर्घकाळपर्यंत संरक्षण होऊ शकते.
लसीकरणामुळे लोकांमध्ये प्रतिकारशक्ती वाढीस लागत आहे.
४० ते ८० टक्के लसीची परिणामकारकता असेल.
गाफील राहून चालणार नाही
देशात सद्य:स्थितीत कोरोनाचा पहिलाच टप्पा संपुष्टात आला आहे.
दुसऱ्या टप्प्याला सुरुवात होणे बाकी असून या पार्श्वभूमीवर देशात पुन्हा कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होणार नाही, याची खबरदारी घ्यायला हवी.
इटली, ब्रिटन, अमेरिका यांच्याप्रमाणे भारताला गाफील राहता कामा नये