CoronavIrus News: कोरोनासारखी संकटे पुढेही येऊ शकतील- पंतप्रधान
By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2021 06:30 AM2021-06-05T06:30:20+5:302021-06-05T06:31:18+5:30
आतापासूनच पूर्ण तयारी करावी लागेल
नवी दिल्ली : कोरोना महामारीच्या संकटाला आज आपण तोंड देत आहोत. भविष्यात अशी अनेक संकटे येऊ शकतील. त्यांच्याशी लढण्यासाठी आम्हाला पूर्ण तयारी करावी लागेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले.
मोदी यांनी वैज्ञानिक आणि औद्योगिक अनुसंधान परिषदेच्या कार्यक्रमात बोलताना वैज्ञानिकांची प्रशंसा केली. ते म्हणाले, ‘आता काळ बदलला आहे. आम्हाला कोणत्याही तंत्रज्ञानासाठी वर्षानुवर्षे वाट बघावी लागत नाही. आधी शोध जगात कोणत्या तरी देशात व्हायचे व त्या तंत्रज्ञानासाठी भारताला अनेक वर्षे वाट पाहावी लागायची. आज आमचे वैज्ञानिक त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करीत आहेत. आमच्या वैज्ञानिकांनी एका वर्षातच स्वदेशी कोरोना लस तयार केली. नरेंद्र मोदी यांनी भविष्यातील गरजांनुसार नियोजन करण्याची गरज असल्याचे सांगून कोरोनासारखी महामारी आज आमच्या समोर आहे. अशी अनेक आव्हाने भविष्याच्या पोटात असू शकतात, असे म्हटले.