CoronaVirus News: प. बंगालमध्ये डॉक्टर दवाखान्यांत येईनात!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2020 02:56 AM2020-05-02T02:56:52+5:302020-05-02T02:57:25+5:30
राज्यातील बहुतांश खासगी डॉक्टरांनी आपले दवाखाने बंद ठेवणेच पसंत केले आहे. त्यामुळे राज्यातील रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे.
कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आवाहन करून दोन दिवस उलटले तरीही कोरोनाच्या धास्तीपायी या राज्यातील बहुतांश खासगी डॉक्टरांनी आपले दवाखाने बंद ठेवणेच पसंत केले आहे. त्यामुळे राज्यातील रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे. फिजिकल डिस्टन्सिंगच्या नियमांचे काटेकोर पालन होण्यासाठी खासगी डॉक्टरांनी दररोज मर्यादित संख्येने रुग्ण तपासावेत असे आवाहनही ममता बॅनर्जी यांनी बुधवारी केले होते. कोरोना साथीमुळे डॉक्टर व अन्य वैद्यकीय कर्मचाऱ्यांनाही संसर्ग होण्याचा मोठा धोका आहे. तो टाळण्यासाठी आवश्यक असलेली साधने डॉक्टरांकडे पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाहीत. त्यामुळे सध्याच्या काळात रुग्णांवर उपचार करणेही कठीण होऊ बसले आहे अशी व्यथा पश्चिम बंगालमधील खासगी डॉक्टरांनी नुकतीच मांडली होती. कोरोना रुग्णांवर उपचार करणाºया डॉक्टरांना मारहाण करण्याचे प्रकार देशात काही ठिकाणी घडले होते. या विषाणूची लागण झाल्याने काही डॉक्टरांचा मृत्यूही झाला आहे.
>रुग्णांचे हाल
कोलकातातील गिरीश पार्क, बुराबाजार तसेच शहरात इतर ठिकाणीही शुक्रवारी खासगी डॉक्टरांनी आपले दवाखाने बंदच ठेवले होते. त्यामुळे रुग्ण दवाखान्याच्या दरवाजाला लावलेले कुलुप पाहून निराश मनाने परत जाताना दिसत होते. कोरोनासदृश लक्षणे असणा-या रुग्णास दाखल करून घेण्यास कोणत्याही रुग्णालयाने नकार देऊ नये असा आदेश पश्चिम बंगालच्या आरोग्य विभागाने दिला आहे.