CoronaVirus News : कोविड-१९मुळे बदलली डीयूची प्रवेश प्रक्रिया, जेएनयूत अर्जाची तारीख ३० पर्यंत
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2020 03:23 AM2020-06-23T03:23:36+5:302020-06-23T03:28:15+5:30
CoronaVirus News : प्रवेशासाठी पहिला कटऑफ सीबीएसई बोर्ड परीक्षेचे निकाल जाहीर झाल्यावर येईल.
एस. के. गुप्ता
नवी दिल्ली : कोरोनाच्या उद्रेकामुळे शाळा, महाविद्यालयांतील शिक्षणाचे स्वरूपच बदलले नाही तर प्रवेश प्रक्रियेतदेखील मोठ्या स्तरावर बदल झाल्याचे बघायला मिळत आहे. दिल्ली विद्यापीठाने (डीयू) जवळपास दीड महिना विलंबाने प्रवेशासाठी अर्जांची प्रक्रिया सुरू केली आहे. पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश चार जुलैपर्यंत खुले आहेत. प्रवेशासाठी पहिला कटऑफ सीबीएसई बोर्ड परीक्षेचे निकाल जाहीर झाल्यावर येईल.
प्रवेश प्रक्रियेचे वैशिष्ट्य हे की, व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश परीक्षेच्या गुणवत्तेवर (मेरीट) स्पोटर््स कोटा आणि अभ्यासेतर उपक्रमांच्या (गीत, संगीत, नृत्य) आधारावर होणारे प्रवेश मुलाखतीशिवाय होतील. विद्यार्थ्यांना त्यांच्या अॅक्टिव्हिटीज आणि परफार्मन्सच्या व्हिडिओ क्लिप अॅटॅच करून पाठवाव्या लागतील.
जवाहरलाल नेहरू विद्यापीठात प्रवेश प्रक्रियेसाठी नॅशनल टेस्टिंग एजन्सीने प्रवेश परीक्षेसाठी अर्ज करण्याची तारीख वाढवून ३० जून केली आहे. आधी ही अंतिम तारीख १५ जून होती. गुरू गोविंद सिंग इंद्रप्रस्थ विद्यापीठातही वेगवेगळ््या अभ्यासक्रमांत प्रवेशासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख वाढवून ३० जून केली आहे. जामिया विद्यापीठात प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आता बोर्ड परीक्षांचे निकाल आल्यानंतर प्रवेशासाठी प्रक्रिया सुरू होईल.
डीयूमध्ये प्रवेश प्रक्रियेआधी दर वर्षी ओपन डेजचे आयोजन केले जात होते. कोविड-१९ मुळे यंदा ओपन डेज वेबिनार आणि आॅनलाइन केले जात आहेत. त्यातून संबंधितांना प्रवेशासंबंधी माहिती घेता येईल. प्रवेशासाठी महाविद्यालयांकडून लावला जाणारा एलिजिबिलिटी क्रायटेरियाला डीयूने हटवला आहे. खेळाच्या कोट्याच्या विद्यार्थ्यांसाठी विना ट्रायल व प्रमाणपत्राच्या आधारावर प्रवेश देणे निश्चित केले आहे. ईसीए कोट्यातील विद्यार्थ्यांना त्यांच्या परफॉर्मन्सची व्हिडिओ क्लिप यूट्यूबवर अपलोड करावी लागेल. त्या आधारावर प्रवेश दिला जाईल.