CoronaVirus News: सामाजिक अंतर राखल्यानेच होणार कोरोनाचे निर्मूलन
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2020 04:35 AM2020-05-02T04:35:08+5:302020-05-02T06:46:28+5:30
तसेच सर्वांनी फिजिकल डिस्टन्सिंग पाळणे अत्यावश्यक आहे, असे या सहा कलमी कार्यक्रमात म्हटले आहे.
नवी दिल्ली : येत्या रविवारी लॉकडाऊन मागे घेण्याची शक्यता वर्तविली जात असतानाच, तसे झाल्यास देशाने आगामी काळात कसे मार्गाक्रमण करावे हे सांगणारा सहा कलमी कार्यक्रम नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीइओ) अमिताभ कांत यांनी सुचविला आहे. देशातील रेड झोनमधील निर्बंध अधिक कडक करावेत. तसेच सर्वांनी फिजिकल डिस्टन्सिंग पाळणे अत्यावश्यक आहे, असे या सहा कलमी कार्यक्रमात म्हटले आहे.
अमिताभ कांत यांनी सहा कलमी कार्यक्रमातील पहिल्या मुद्द्यात म्हटले आहे की, रेड झोनमधील कोरोना साथीचा फैलाव रोखण्यासाठी तिथे लॉकडाऊन अत्यंत कडकपणे अमलात आणला पाहिजे. त्यांचा दुसरा मुद्दा तोंडाला मास्क बांधणे व फिजिकल डिस्टन्सिंग संदर्भातील आहे.
कोरोना साथीचे निर्मूलन करायचे असल्यास ही बंधने नागरिकांनी पाळायलाच हवीत, असे कांत यांनी म्हटले आहे. तिसरा मुद्दा ही साथ पुन्हा फैलावण्याच्या धोक्याबद्दल आहे. ३० एप्रिल ते १५ मे या कालावधीत देशात कोरोना साथीचा दुसरा फेरा येण्याची शक्यता असल्याचा इशारा तज्ज्ञांनी याआधीच दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर अमिताभ कांत यांनी सांगितले की, कोरोनाची साथ पुन्हा उद्भवण्याच्या शक्यतेपासून जनतेने खूप सावध राहिले पाहिजे. चौथ्या मुद्द्यात ते म्हणतात की, ६० वर्षांपेक्षा अधिक वयोमान असलेल्या व हृदयविकार, श्वसनाचे आजार, कर्करोग यांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांचा कोरोनापासून बचावासाठी काळजी घेतली पाहिजे. अमिताभ कांत यांनी पाचव्या मुद्द्यात म्हटले आहे की, कोरोनावर औषध जोपर्यंत उपलब्ध होत नाही तोवर कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे मानवजातीला असलेला धोका कायम राहील.
>टप्प्याटप्प्याने आर्थिक व्यवहार सुरू व्हावेत
नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनी सहा कलमी कार्यक्रमाच्या अखेरच्या मुद्द्यामध्ये म्हटले आहे की, लॉकडाऊनमधील मुदतवाढीमुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर काही अडचणी निर्माण झाल्या आहेत. भारताचा विकासदर २०२० साली अवघा ०.२ टक्के इतका राहील, असे भाकित मुडीज या संस्थेने वर्तविले आहे. या परिस्थितीवर मात करण्यासाठी जिथे कोरोना साथीचा फार फैलाव नाही, अशा भागांमध्ये आर्थिक व्यवहार, उद्योगधंदे टप्प्याटप्प्याने सुरू करावेत.