CoronaVirus News: कोरोनामुळे १८ दिवसांत कुटुंब उद्ध्वस्त; चार जणांचा मृत्यू, सुनेची आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2021 03:04 PM2021-05-03T15:04:50+5:302021-05-03T15:09:39+5:30
CoronaVirus News: कोरोनामुळे हसतंखेळतं कुटुंब उद्ध्वस्त; कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर
देवास: गेल्या दोन दिवसांत देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत थोडी घट झाली आहे. मात्र अनेक राज्यांमध्ये कोरोनामुळे परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानं उत्तर प्रदेश, गुजरात, राजस्थान, कर्नाटक, छत्तीसगड, मध्य प्रदेश, बिहारमधील आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटरवर आहे. त्यामुळे अनेकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. मध्य प्रदेशच्या देवास जिल्ह्यात एका कुटुंबावर कोरोनामुळे दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अवघ्या १८ दिवसांत कुटुंबातील ४ सदस्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
कोरोनामुळे देवासमधील एक हसतंखेळतं कुटुंब उद्ध्वस्त झालं. गेल्या १८ दिवसांत कुटुंबातील ४ सदस्यांचं कोरोनामुळे निधन झालं. या धक्क्यानं घरच्या सुनेनं आत्महत्या केली. त्यामुळे आता कुटुंबात केवळ एक वृद्ध व्यक्ती आणि लहान मुलं आहेत. देवासच्या मैनाश्री नगरात वास्तव्यास असलेल्या बालकिशन गर्ग यांच्या कुटुंबावर संकटांचा डोंगर कोसळला आहे.
बालकिशन गर्ग यांची पत्नी चंद्रकला देवी यांचं सर्वात आधी कोरोनामुळे निधन झालं. १९ एप्रिलला गर्ग यांनी त्यांचा मोठा मुलगा संजय कोरोनामुळे गमावला. त्यानंतर २० एप्रिलला त्यांचा लहान मुलगा स्वप्नेशचं कोरोनामुळे निधन झालं. पत्नी आणि दोन मुलांच्या निधनामुळे गर्ग यांना धक्का बसला. घरावर आलेल्या संकटामुळे लहान सून रेखा अक्षरश: कोलमडून पडली. तिला हे धक्के सहन झाले नाहीत. तिनं २१ एप्रिलला आत्महत्या करून जीवन संपवलं.
रेखाच्या आत्महत्येमुळे कुटुंब आणखी संकटात सापडलं. घरात केवळ बालकिशन गर्ग, त्यांची मोठी सून रितू आणि चार लहान लहान मुलं राहिली. मात्र दुर्दैवाचा फेरा इथेच थांबला नाही. रितू गर्ग यांना कोरोनाची लागण झाली. त्यांना इंदूरच्या एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. रविवारी त्यांची प्रकृती अधिक बिघडली आणि त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यामुळे आता कुटुंबात केवळ बालकिशन गर्ग आणि दोन मुलांची चार लहान मुलं आहेत.