CoronaVirus News: देशात कोरोनाचे रुग्ण खरंच कमी की चौथ्या लाटेला सुरुवात? जाणून घ्या काय सांगते आकडेवारी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2022 07:37 PM2022-04-18T19:37:41+5:302022-04-18T19:37:56+5:30
CoronaVirus News: गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ; प्रशासनाचं टेन्शन वाढण्याची शक्यता
नवी दिल्ली: देशात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. दिल्लीसह इतर राज्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. मात्र या वाढीमधून चौथ्या लाटेचे संकेत मिळतात का? आकडेवारी पाहिल्यास कोरोना रुग्णांची संख्या कमी आहे. मात्र तरीही चौथ्या लाटेची भीती व्यक्त होत आहे. त्यामागचं प्रमुख कारण म्हणजे पॉझिटिव्हिटी रेट.
दिल्लीत पॉझिटिव्हिटी रेट ५ च्या जवळ पोहोचला आहे. इतर राज्यांमध्येही हा रेट वाढला आहे. पण तरीही रुग्णांची संख्या कमी आहे. कोरोना चाचण्यांची संख्या गेल्या महिन्याभरात कमी झाल्याचं आकडेवारी सांगते. त्यामुळेच सध्या देशात कोरोना रुग्णांची संख्या कमी आहे. चाचण्यांची संख्या वाढवल्यास रुग्णसंख्यादेखील वाढेल. कारण पॉझिटिव्हिटी रेट अधिक आहे.
दिल्ली, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, केरळ, राजस्थान, बंगाल, कर्नाटक या राज्यांमध्ये कोरोना चाचण्यांची संख्या गेल्या महिन्याच्या तुलनेत कमी आहे. काही काही राज्यांमध्ये तर ती निम्म्याच्या खाली आली आहे. महाराष्ट्रात १६ मार्चला ५६ हजार ५७४ चाचण्या झाल्या. १६ एप्रिलला हाच आकडा १९ हजार ५१८ वर आला. इतर राज्यांमध्येही हीच परिस्थिती आहे.
कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट झाल्यानं अनेक राज्यांनी चाचण्यांची संख्या कमी केली. महाराष्ट्रात मास्कसक्तीही मागे घेण्यात आली. या महिन्याच्या सुरुवातीला XE या नव्या व्हेरिएंटनं चिंता वाढवली. कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली. मात्र अद्याप तरी चिंता करण्यासारखी परिस्थिती नसल्याचं तज्ज्ञ सांगतात. मात्र मास्कसक्ती मागे करण्याच्या निर्णयावर तज्ज्ञांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.